रखडलेल्या चौपदरीकरणाला मिळणार गती

रमेश धायगुडे
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

लोणंद - शिरवळ- लोणंद- फलटण- बारामती हा मार्ग बदलून आता सातारा- लोणंद- भोर असा करण्यात आल्याने आणि एकूण १२७ किलोमीटर लांबीच्या रस्ता चौपदरीकरणासाठी तीन हजार कोटी, तर जिल्ह्याच्या हद्दीतील ७७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी १८०० कोटी रुपयांचा निधी नुकताच शासनाकडून मंजूर झाला आहे. त्यामुळे गेल्या नऊ वर्षांपासून शेतकरी, शासन व न्यायालयीन प्रक्रियेच्या कचाट्यात अर्धवट पडलेल्या लोणंद -शिरवळ या रस्त्याचे चौपदरीकरण आता केवळ मुहूर्ताच्या प्रतीक्षेत आहे. 

लोणंद - शिरवळ- लोणंद- फलटण- बारामती हा मार्ग बदलून आता सातारा- लोणंद- भोर असा करण्यात आल्याने आणि एकूण १२७ किलोमीटर लांबीच्या रस्ता चौपदरीकरणासाठी तीन हजार कोटी, तर जिल्ह्याच्या हद्दीतील ७७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी १८०० कोटी रुपयांचा निधी नुकताच शासनाकडून मंजूर झाला आहे. त्यामुळे गेल्या नऊ वर्षांपासून शेतकरी, शासन व न्यायालयीन प्रक्रियेच्या कचाट्यात अर्धवट पडलेल्या लोणंद -शिरवळ या रस्त्याचे चौपदरीकरण आता केवळ मुहूर्ताच्या प्रतीक्षेत आहे. 

बारामती- फलटण- लोणंद- शिरवळ हा पुणे व बारामती या दोन मोठ्या शहरांना जोडणारा व विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा रस्ता म्हणून बारामती- लोणंद- शिरवळ या ८० किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम २००९ मध्ये सुरू केले होते. सुरवातीला शिरवळ बाजूकडून या मार्गावरील पुलांची कामे पूर्ण केली, तसेच शिरवळपासून वीर धरणापर्यंत आणि भादे, वाठार हद्दीत व पुढे लोणंद एमआयडीसीच्या हद्दीतही चौपदरीकरणाचे काहीअंशी काम पूर्ण झाले आहे. दरम्यान वीर धरण, भादे व त्यापुढे मधल्या टप्प्यातील शेडगेवाडी, अंदोरी व लोणंद हद्दीत या रस्त्याचे काम रखडले आहे.

खंडाळा तालुक्‍यातून हा रस्ता जात असताना हजारो शेतकऱ्यांच्या बागायती जमिनीतून, तसेच अनेक घरादारावर नांगर फिरणार असल्याने शासन पातळीवरून त्याची योग्य भरपाई मिळावी, यासाठी अंदोरीतील शेतकऱ्यांनी कामास विरोध दर्शवला होता. त्यानंतर एकूण शेतकऱ्यांपैकी ८० ते ९० टक्के शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रती गुंठा नऊ हजारऐवजी २५ हजार रुपयांपर्यंत प्रती गुंठा मोबदला दिला गेला. ज्यांची घरेदारे जात आहेत त्यांनाही मोबदला देण्यात आला आहे. दरम्यान उरलेल्या काही शेतकऱ्यांनी हे पैसे घेण्यास नकार देऊन केंद्र शासनाच्या २०१३ च्या जीआरनुसार रेडीरेकनरप्रमाणे योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी केली; पण या मागणीची दखल न घेतल्याने अंदोरी, शेडगेवडी, दापकेघर व भादे येथील काही शेतकऱ्यांनी श्री. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

२०१५ मध्ये त्या याचिकेवर निकाल होऊन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना रेडीरेकनरनुसार मोबदला देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. मात्र, त्या निर्णयावरही अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. अंदोरीत मातंग व बौद्ध वस्तीतील १५ ते २० कुटुंबांची घरे, लोणंद येथील मोठे क्षेत्र या रस्त्यात जात होते, तसेच येथे रेल्वे उड्डाणपूल सिमेंट काँक्रिटचा पिलर उभारून व्हावा, अशी मागणीही केली जात होती. मात्र सध्या हा रस्ताच बदलून भोर- लोणंद- सातारा असा झाला आहे, तर शासन पातळीवरून या रस्त्यासाठी तीन हजार कोटी रुपयांचा निधीही मंजूर केल्याने या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जीव मुठीत धरून प्रवास
खंडाळा तालुक्‍याच्या हद्दीत लोणंद ते वीर धरणापर्यंतच्या रस्त्यावरील असंख्य खड्ड्यांमुळे आजवर अनेक अपघातात लोकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. अनेकांना हातपाय, मणके मोडून गंभीर दुखापत व अपंगत्वाला सामोरे जावे लागले आहे. या मार्गावरून दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांना तर जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी व नागरिक पुरते हैराण झाले आहेत. हा रस्ता कधी होणार हाच प्रश्न प्रत्येक जण विचारत आहेत. 

Web Title: Road Work