सांगलीच्या पश्‍चिम भागातील रस्ते अद्याप बंदच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

शहरात महापुराचे पाणी उतरत आहे. त्यामुळे हळूहळू रस्ते खुले होत आहेत. बऱ्याच भागातील रस्त्यांनी आज मोकळा श्‍वास घेतला. मात्र पाणी उतरण्याचा वेग पाहता उद्या मंगळवारी इस्लामपूर, पुणे, कोल्हापूर या भागात जाणारे रस्ते खुले होतील अशी शक्‍यता आहे.

सांगली : शहरात महापुराचे पाणी उतरत आहे. त्यामुळे हळूहळू रस्ते खुले होत आहेत. बऱ्याच भागातील रस्त्यांनी आज मोकळा श्‍वास घेतला. मात्र पाणी उतरण्याचा वेग पाहता उद्या मंगळवारी इस्लामपूर, पुणे, कोल्हापूर या भागात जाणारे रस्ते खुले होतील अशी शक्‍यता आहे. 

सांगलीत आज महापुराची पाणी पातळी 50 फुटांपेक्षा कमी होती. त्यामुळे सकाळीच एस.टी. बस स्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, झुलेलाल चौक तसेच गणपती पेठ, सराफ कट्‌टा, मेन रोड या भागातील पाणी उतरले. दुपारनंतर सांगली बस स्थानकातून आटपाडी, विटा, जत, तासगाव या भागात जाणाऱ्या एस.टी. सुरु करण्यात आल्या. सकाळी पाणी उतरल्यानंतर या सर्व परिसरातील स्वच्छता करण्यात आली. विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. 

महापुराचे पाणी जसे वाढत गेले तसा सांगलीचा इस्लामपूर, पुणे, कोल्हापूर या भागाशी संपर्क तुटला होता. आयर्विन पूल, बायपास पूल, कोल्हापूर रोड या मार्गावरुन जाणारी वाहतूक पूर्ण बंद झाली होती. सांगली बस स्थानकातून संपूर्ण एसटी सेवाही बंद होती. तासगाव, विटा, आटपाडी या भागात जाणाऱ्या एसटी वसंतदादा कारखान्यापर्यंत येत होत्या. तेथूनच परत जात होत्या. 

पुणे आणि कोल्हापूरला जाण्यासाठी तासगाव, विटा, कराड या मार्गाने "वाईमार्गे सातारा' करुन जावे लागत होते. आजपासून पलूसमार्गे पुणे गाडी सुरु करण्यात आली आहे. मात्र अद्याप मिरज पश्‍चिम भागात जाणारे रस्ते खुले झाले नसल्याने वाळवा, शिराळा या तालुक्‍यांमध्ये एसटी बसेस सुरु करण्यात आलेल्या नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Roads of west Sangli area still closed