चोरट्यांना मिळाला आषाढीचा विशेष प्रसाद!

सकाळ वृतसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

- पंढरपूर येथे आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक जात असतात.

- यासाठी मोहोळ हे मध्यवर्ती ठिकाण आहे.

- याच गर्दीचा फायदा घेऊन चोरी करण्याच्या हेतूने आलेल्या चार आरोपींसह एक इंडिका कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

मोहोळ : पंढरपूर येथे आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक जात असतात यासाठी मोहोळ हे मध्यवर्ती ठिकाण आहे. याच गर्दीचा फायदा घेऊन चोरी करण्याच्या हेतूने आलेल्या चार आरोपींसह एक इंडिका कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

ही घटना शुक्रवार (ता.१२) मोहोळ बसस्थानक परिसरात घडली. शिवाजी सुभाष घोलप वय एकोणतीस (रा.जागजी मुरुड जि .लातूर), राजेंद्र विद्याधर नितळे वय पन्नास (रा. लातूर), बीबीनंदा इंद्रजित कसबे वय पन्नास, ज्योती जितेश सकट वय सव्वीस दोघी (रा. जयनगर) नांदेड नाका झोपडपट्टी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत .

मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (ता.१२) जुलै रोजी मोहोळ बसस्थानक परिसरात गुन्हे शोध पथकातील कर्मचारी नाकाबंदी करून गस्तीचे कर्तव्य करीत असताना, त्यांना गर्दीत पांढरी इंडिका कार क्रमांक 'एम एच २५ आर ००२४' ही गाडी संशयितपणे उभी असल्याचे दिसून आले.

तर सदर गाडीतील लोक गर्दीत जाऊन पुन्हा त्याच गाडीत येऊन बसत होते. तेंव्हा संशय आल्याने त्या लोकांना पोलिसांनी जाऊन गाडीच्या मालकीबद्दल विचारणा केली असता, कोणतीही कागदपत्रे त्यांच्याकडून मिळाली तर नाहीतच उलट त्यांनी उडवाउडवीची दिली. त्यामुळे सखोल चौकशी केल्यानंतर हे लोक गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्यांच्याकडून  मोबाईल , रोख रक्कम व इंडिका कार असा एक लाख पंच्याऐंशी हजार चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार  निलेश देशमुख, शरद ढावरे, विजय माने, गणेश दळवी, अभिजित गाटे यांनी सहभाग नोंदविला .

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbers held by police at Mohol