गडहिंग्लज तालुक्यात एका रात्रीत चार गावात 13 घरफोड्या

गडहिंग्लज तालुक्यात एका रात्रीत चार गावात 13 घरफोड्या

गडहिंग्लज - गडहिंग्लज तालुक्‍यातील हसूरवाडी, नूल, भडगाव आणि चन्नेकुप्पी येथे एकाच रात्रीत 13 घरफोड्या झाल्या. या घटनांमध्ये रोख रक्कमेसह चार लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज अज्ञातांनी लंपास केला आहे. विशेष म्हणजे कटावणीने बंद घरांचे कुलूप तोडून या सर्व चोऱ्या झाल्या असून यामुळे ग्रामीण भाग भीतीने हादरून गेला आहे. गुरूवारी (ता. 25) मध्यरात्रीच्या सुमारास या घटना घडल्या आहेत. 

दोन मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी नूलमधील एक घर आणि दोन मेडीकल्सना लक्ष्य केले. हसूरवाडी किंवा नूलपासून अज्ञातांनी चोरीच्या सत्राची सुरूवात केल्याचा अंदाज आहे. याच रात्री हसूरवाडी, चन्नेकुप्पी आणि शहरालगतच्या भडगाव गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. कुलूपबंद घरांनाच चोरट्यांनी लक्ष्य केले.

काही ठिकाणी कटावणीने कुलूप तोडून तर काही घरांचे कुलूप कोणत्यातरी यंत्राच्या सहाय्याने कापून घरात प्रवेश करून चोरी केली आहे. तालुक्‍यात एकाच रात्री तेरा घरांमध्ये चोरी होण्याचा पहिलाच प्रकार असल्याने तालुक्‍यातील ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

हसूरवाडीतील दिलीप शिंदे, किरण इंगळे, चाळू घोटणे, पांडूरंग चव्हाण, तानुबाई वाघराळकर व हौशाबाई नाईक यांच्या घरात चोरी झाली. यातील शिंदे, इंगळे, घोटणे, चव्हाण हे मुंबईत स्थायिक असल्याने त्यांच्या घरात चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. परंतु, तानुबाई या घर बंद करून नौकूडला देवाच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत तिजोरीतील सोन्याचा टिक्का, लक्ष्मी हार, गंठण, अंगठी, नेकलेस, कर्णफुले अशा दहा तोळ्यांची दागिने व रोख 15 हजार रूपये लंपास केले आहे. पोलिसात रोखसह 96 हजार रूपयाचा ऐवज लंपास झाल्याची नोंद असली तरी बाजारभावानुसार सोन्याची किमत तीन लाखांवर होते. याप्रकरणी तानुबाई वाघराळकर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

भडगाव (ता. गडहिंग्लज) पैकी समर्थनगरातील आप्पासाहेब पट्टणकुडी व अजित माने यांची घरे फोडली. पट्टणकुडींच्या घरातून रोख दोन हजार रूपयाची चोरी झाली. चन्नेकुप्पी येथील पोस्ट ऑफीसमधून साडेआठ हजार तर विलास भदरगे यांच्या घरातून रोख वीस हजार रूपये चोरट्यांनी लांबविले आहेत. भदरगे यांच्या घराला दोन्ही बाजूने दरवाजे आहेत. या घरात भदरगे यांची आई एकटीच असते. ती रात्री एका दरवाजाला कुलूप लावून झोपली होती. तेच कुलूप अज्ञातांनी तोडून चोरी केली. 

मेडीकलमधून 20 हजार लंपास
नूल : येथील बाळासाहेब शिंदे यांच्या घरी व सचिन चित्तारी यांचे अमृता मेडीकल व विकास शहा यांच्या विकास मेडीकल्समध्ये चोरी झाली. गणेश मंदिराजवळील शिंदे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. येथील तिजोरीत चोरट्यांच्या हाती काहीच लागले नसले तरी शिंदे यांचे एअरफोर्समध्ये सेवेत असलेल्या मुलाची महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग लंपास केली आहे. चित्तारी यांच्या अमृता मेडीकल्सचे शटर उचकटून ड्रॉवरमधून 8 हजार रूपयाची चोरी केली. शहा यांच्या विकास मेडीकल्सचेही शटर उचकटून त्यातील 12 हजार 500 रूपये लांबवले. या चोरीची नोंदही पोलिसात झाली असून हवालदार बाजीराव कांबळे व संभाजी जाधव यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

चोरटे सीसीटीव्हीत कैद
नूलमध्ये मेडीकलचा शटर उघडण्याचा आवाज आल्याने शहा उठून बाहेर आले. त्यावेळी त्यांच्या नजरेस चोरटे पडले. मेडीकलमधील सीसीटीव्हीतही चोरटे कैद झालेत. परंतु, काळे कापड बांधल्याने त्यांचे चेहरे दिसत नाहीत. दोन मोटरसायकलीसुद्धा सीसीटीव्हीत दिसतात. चोरटे मराठी व कन्नड भाषा बोलत होते. त्याअर्थी हे चोरटे सीमाभागातील असण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, भडगावपैकी बेरडवाडी येथील एका घराचे कुलूप तोडताना शेजारच्या घरातील एकजण उठून बाहेर आला. इतक्‍यात चौघे चोरटे मोटरसायकलवरून पसार झाल्याचेही तेथील ग्रामस्थाने पाहिले आहे.

पोलिसांसमोर आव्हान
एकाच रात्री तेरा घरफोड्या होण्याची ही पहिलीच वेळ आहे. चोरटे सीमाभागातील असावेत असा अंदाज आहे. आता तपास करून या चोरट्यांना ताब्यात घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीवर जिल्ह्यातील मतदान संपले तरी अजूनही चेकपोस्ट कार्यान्वित आहेत. चेकपोस्टमार्गे चोरटे गेले असते तर त्यांची तपासणी झाली असती, परंतु बहुधा हे चोरटे चेकपोस्ट नसलेल्या भागातून कर्नाटकात गेले असावेत किंवा चोरटे महाराष्ट्रच्या सीमाभागातीलच असण्याचीही शक्‍यता आहे. 

कुलूप लावून टेरेसवर झोपी
नूलमधील श्री. शिंदे तर भडगावमधील श्री. पट्टणकुडी कुटूंबिय उकाड्यामुळे घराला कुलूप लावून टेरेसेवर झोपले होते. घर बंद असल्याचा गैरफायदा घेवूनच चोरट्यांनी ही घरे लक्ष्य केली. परंतु या दोन्ही घरातून चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com