कुरियर कंपनीची कार्यालये फोडणारा चोरटा जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जुलै 2019

  • कुरिअर कंपनीच्या कार्यालयांना लक्ष करून तेथील रोकड चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक. 
  • बबन सर्जेराव जाधव (रा. चौधरवाडी ता. फलटण, जि. सातारा) असे त्याचे नाव.
  • कोल्हापूर, सांगली सातारा परिसरात 14 गुन्ह्यांची कबुली. 
  • आलिशान मोटारीसह रोकड, चोरीचे साहित्यासह सुमारे 12 लाखांचा मुद्देमाल जप्त. 

कोल्हापूर - कुरिअर कंपनीच्या कार्यालयांना लक्ष करून तेथील रोकड चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. बबन सर्जेराव जाधव (रा. चौधरवाडी ता. फलटण, जि. सातारा) असे त्याचे नाव आहे. कोल्हापूर, सांगली सातारा परिसरात 14 गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली असून त्याच्याकडून आलिशान मोटारीसह रोकड, चोरीचे साहित्यासह सुमारे 12 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 

संशयित बबन जाध च्या आणखी एका साथीदाराचा शोध सुरू असून त्याच्याकडून आणखी गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. पोलिस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

न्यू शाहूपुरी येथील इकॉम्‌ एक्‍स्प्रेस प्रा.लि या कुरिअर कंपनीचे कार्यालय उचकटून चोरट्यांनी 13 जून रोजी रोकड पळविली होती. त्याच दिवशी इचलकरंजी येथील शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ब्लू डार्ट कुरिअर कंपनीतही असाच प्रकार घडला होता. या दोन्ही कार्यालयातील मिळून 

दोन लाखांची रोकड चोरट्यांनी पळविली होती. एकाच रात्री दोन ठिकाणी कुरिअर कंपनीच्या कार्यालयात झालेल्या या चोरीचा समांतर तपास करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार व त्यांच्या पथकाने या चोरीचा उलगडा करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली होती.

या चोरीच्या अनुशंगाने माहिती घेत असताना पथकातील कॉन्स्टेबल अर्जुन बंदरे व नितीन चोथे यांना या दोन्ही चोऱ्या सातारा जिल्ह्यातील बबन जाधव याने केल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली. पथकाने बबन जाधवची सविस्तर माहिती मिळवली. पथक त्याच्या शोधासाठी सातारा येथे जाण्याच्या तयारीत असतानाच जाधव हा शनिवारी (ता.6) आलिशान मोटारीतून कोल्हापूरात येणार असून त्याची मोटार चोरीची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पथकाने पुणे -बंगळूर महामार्गावर तावडे हॉटेल जवळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये घरफोडीसाठी लागणारे साहित्य, एलईडी टीव्ही व पन्नास हजारांची रोकड मिळून आली. पोलिसांनी या वस्तूंबाबत जाधवकडे सखोल चौकशी केली असता त्याने कोल्हापूर जिल्ह्यातील कुरियर कार्यालयातून या वस्तू चोरल्याची कबुली दिली. 

त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रायगड व रत्नागिरी आदी ठिकाणी कुरियर कंपनीची 14 कार्यालये साथीदार सतीश चव्हाण (रा. गुळूंची,ता. पुरंदर जि. पुणे) यांच्या मदतीने चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून 5 लाख 93 हजाराच्या रोकडसह मोटार, दोन एलईडी टीव्ही, घरफोडीचे साहित्य असा 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार,सहाय्यक फौजदार नेताजी डोंगरे, सुरेश चव्हाण, पोहेकॉ अर्जुन बंद्रे, नितीन चोथे, अमोल कोळेकर, राजेंद्र हांडे,संदीप कुंभार, पांडुरंग पाटील, जितेंद्र भोसले, रवींद्र कांबळे, संजय पडवळ, संतोष पाटील, अजय काळे, रणजित कांबळे नामदेव यादव, 
अमर आडसुळे, अमित सर्जे आदींनी केली. 

विकलेली मोटार चोरली 
संशयित बबन जाधव हा बारावी नापास आहे. त्याने गेल्या वर्षी आलिशान मोटार खरेदी केली होती. अवघ्या काही दिवसातच त्यांनी ही मोटार सातारा जिल्ह्यातील एका व्यक्तीला विकली होती. त्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी त्याने स्वतः विकलेली मोटार चोरली व त्याची नंबर प्लेट बदलून तो ती वापरत होता. चोरीसाठी याच गाडीचा वापर करत असल्याने त्याच्यावर कोणाला संशय येत नव्हता. त्याच्याकडे आणखी दोन दुचाकीही असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. 

आठ वर्षा पासून होता फरारी 
कुरिअर कंपनीच्या कार्यालयात मोठी रोकड हाती लागते. पोलिसांना सापडल्यास रोकड जप्त करणे आव्हानाचे असते हे संशयित जाधव याला माहीत असल्याने तो फक्त कुरिअर कंपनीच्या कार्यालयाला लक्ष करत होता. त्याच्यावर वाहन चोरी, वीज चोरी असे 8 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ठराविक कालावधीनंतर तो घर बदलत असल्याने आठ वर्षांपासून तो फरारी होता. अखेर कॉन्स्टेबल अर्जुन बंद्रे व नितीन चोथे यांनी केलेल्या तपासामुळे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. 

येथे केल्या चोऱ्या 
सांगली - 1 
सातारा - 3 
पुणे- 5 
रायगड- 1 
रत्नागिरी - 2 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: robbery in courier company Thief arrested