पोलिस वेळेत पोहोचल्याने दरोडा फसला

विलास कुलकर्णी
रविवार, 8 डिसेंबर 2019

आरोपी बोऱ्हाडे एटीएम सेंटरमध्ये घुसून एटीएम मशीन फोडत होता. त्याचे चार-पाच साथीदार एटीएम सेंटरच्या आसपास अंधारात पाळत ठेवून लपले होते.

राहुरी (नगर ): राहुरी बस स्थानकासमोर नगर-मनमाड महामार्गाच्या शेजारी असलेले स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम आज (रविवारी) पहाटे सव्वा तीन वाजता दरोडेखोरांनी फोडले; परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोडा फसला. एका आरोपीस पाठलाग करून, पहाटे चार वाजता पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून दरोड्याचे साहित्य ताब्यात घेतले. पोलिसांची चाहूल लागल्याने त्याचे चार ते पाच साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. 

दत्तात्रेय लक्ष्मण बोऱ्हाडे (वय21, रा. कोंढवड, ता. राहुरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एक लोखंडी कटावणी, एक लोखंडी टॉमी, दोन मोठे स्क्रू ड्रायव्हर असे दरोड्याचे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले. 

हेही वाचा ः जिल्हा क्रीडा संकुलातील दीड हजार चौरसफूट बांधकामावर हातोडा 

आरोपी बोऱ्हाडे एटीएम सेंटरमध्ये घुसून एटीएम मशीन फोडत होता. त्याचे चार-पाच साथीदार एटीएम सेंटरच्या आसपास अंधारात पाळत ठेवून लपले होते. मशीनमधील रकमेपर्यंत आरोपी पोहोचला नव्हता. पहाटे सव्वा तीन वाजता मल्हारवाडी चौकातून बस स्थानकाच्या दिशेने पोलिसांच्या गस्तीचे वाहन आले. पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके, कॉन्स्टेबल ज्ञानेश्‍वर पथवे, पोलीस शिपाई श्रीकृष्ण केकान, होमगार्ड ज्ञानेश्‍वर दाभाडे व संजय इंगळे गस्ती पथकात होते. 

उपनिरीक्षक शेळके यांनी नेहमीप्रमाणे महामार्गावरील एटीएम सेंटर कडे पाहिले. त्यांना एटीएम सेंटरमध्ये व बाहेर अंधार दिसला. अंधारात चार-पाच जणांच्या हलचाली जाणवल्या. त्यांनी पथकाला सावध केले. अंधारात लपलेले आरोपी वेगवेगळ्या दिशेने पसार झाले. जातांना त्यांनी एटीएम सेंटरमध्ये घुसलेल्या साथीदारास इशारा केला. एटीएमचा सेंटरचा दरवाजा उघडून, आरोपी बोऱ्हाडे झपाट्याने बाहेर पळतांना पथकाने पाहिला. पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला. मल्हारवाडी चौकात एलआयसीच्या कार्यालयाजवळ आरोपी लपला. पथकाने त्याला घेरले. तेथून, आरोपीने धूम ठोकली; परंतु मल्हारवाडी चौकात एका खड्ड्यात पाय गेल्याने आरोपी पडला. तेथेच पोलिसांनी झडप घालून त्याला ताब्यात घेतले. 

दरोड्याचे साहित्य एटीएम सेंटर मध्येच टाकून पलायन केल्याचे आरोपीने सांगितले. पोलीस पथकाने आरोपीला एटीएम सेंटरमध्ये नेऊन दरोड्याचे साहित्य ताब्यात घेतले. पोलिसांचे गस्ती पथक वेळेत पोहोचल्याने दरोड्याचा प्रयत्न फसला. 

गुन्हा दाखल 

श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, राहुरीचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळाची भेट देऊन पाहणी केली. पोलीस कॉन्स्टेबल श्रीकृष्ण बाबासाहेब केकान (वय 31, नेमणूक राहुरी) यांच्या फिर्यादीवरून आरोपी दत्तात्रेय बोऱ्हाडे व त्याच्या पाच ते सहा साथीदार विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात दरोडा घालण्यासाठी एकत्र येऊन दरोड्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The robbery happened when the police arrived in time