उभ्या पिकांवरतीच फिरवला रोटर; भाजीपाला उत्पादकांना फटका

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 July 2020

सलगरे, बेळंकी परीसरातील भाजीपाला उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे, लॉकडाऊन काळात खरेदी-विक्री बंद आणि दर नसल्याने वांगी, टोमॅटोच्या उभ्या पिकांवरतीच उत्पादक शेतकऱ्यांनी रोटर फिरविला. 

सलगरे (जि. सांगली) : सलगरे, बेळंकी परीसरातील भाजीपाला उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे, लॉकडाऊन काळात खरेदी-विक्री बंद आणि दर नसल्याने वांगी, टोमॅटोच्या उभ्या पिकांवरतीच उत्पादक शेतकऱ्यांनी रोटर फिरविला. 

मिरज पूर्व भागातील आणि महाराष्ट्र-कर्नाटक सिमारेषेवर धान्य,कडधान्ये शेळ्या- मेंढ्या आणि ताजा भाजीपाला खरेदी -विक्रीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सलगरे बाजारपेठेत रब्बी हंगामातील शाळू,गहू ,हरभरा,मका आणि कडधान्ये भाजीपाल्यामध्ये टोमॅटो, गवारी, वांगी, कारली, दोडका, मिरची, कोबी, भेंडी, भोपळा आदी ताजा भाजीपाला सलगरे आठवडा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होत होती.

मात्र कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्स आणि लॉंकडाऊन च्या दरम्यान सलगरे येथील संपूर्ण बाजार किरकोळ विक्री वगळता अजून बंद करणेत आला आहे. तसेच सलगरे, चाबुकस्वारवाडी,बेळंकी परीसरात पिकविलेला भाजीपाला विक्रीसाठी जयसिंगपूर,कोल्हापूर येथील मार्केट मध्ये जाणारा बंद झाल्याने संपूर्ण उलाढाल ठप्प झाली होती. सलगरे,चाबुकस्वारवाडी, बेळंकी परीसरातून दररोज सहा ते सात टेंम्पोतून विविध प्रकारचा भाजीपाला विक्रीसाठी जात होता.

मात्र प्रशासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लॉंकडाऊन सुरु करण्यात आल्याने सर्व भाजीपाला मार्केट बंद केल्यामुळे भाजीपाला उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी महागडी औषधे, खते घालून उत्पादित केलेल्या भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .आठवडा बाजार,भाजीपाला मार्केट बंद,वाहतूक बंद आणि गावात फिरुन विक्री करणेही बंद यांमुळे मोठ्या कष्टाने महागडे बियाणे, रोपा,औषधे मजूर लावून शेतकऱ्यांने पिकवलेला भाजीपाला शेतातच पडून सडून जात होता. 

मका,ज्वारीचेही दर कोलमडले 
दरम्यान, भाजीपाल्याबरोबर या परीसरात मोठ्या प्रमाणात मका आणि ज्वारीचे उत्पन्न घेतले जाते स्वस्तदरात धान्य मिळण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या सलगरे धान्यपेठेत लॉंकडाऊन काळात 17,18रुपये खरेदी असणारा दर 12रु.पासून14रु.पर्यंत घसरल्याने भाजीपाल्याबरोबरंच मका आणि ज्वारी च्या दरात घसरण झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.रोगराई, नैसर्गिक आपत्ती आणि आता कोरोना प्रादुर्भाव यांमुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे जगणे मुश्‍कील झाले आहे. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सिमाभागातील अनेक छोट्या-मोठ्या शेतकरी, व्यापाऱ्यांना सलगरे आठवडा बाजार बंद असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. 

कवडीमोल दराने भाजीपाला विक्री 
चाबुकस्वारवाडीतील भाजीपाला उत्पादक शेतकरी व वाहतूकदार बाळासाहेब कोरे आणि सलगरेतील सत्त्याप्पा चौगुले यांनी सांगितले की लॉंकडाऊन च्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी हजारो रु.खर्च करुन पिकविलेला भाजीपाला कवडीमोल दराने विक्री केला गेला.नंतर व्यापाऱ्यांनी खरेदी करणे बंद केले, सर्व मार्केट बंद असल्याने त्यादरम्यान उत्पादित वांगी, दुधी भोपळा,दोडका, कारली,टोमॅटो ढबू मिरची इ.भाजीपाला शेतातच सडून गेला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rotor rotated on crops; hit's vegetable growers