अधिकारी सक्षम; पण यंत्रणा ढिसाळ

राजेश मोरे
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

आरटीओ कॅम्पची अवस्था; इंटरनेट कनेक्‍शनसह विजेचा अडथळा; नागरिकांचे हाल

कोल्हापूर - शहरासह ग्रामीण भागातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) कॅम्प म्हणजे सक्षम अधिकारी आणि ढिसाळ यंत्रणा अशी अवस्था झाली आहे. ऑनलाइन प्रक्रियेसाठी इंटरनेट कनेक्‍शनसह वीजपुरवठ्याच्या अडथळ्यामुळे नागरिकांना वाहन परवान्यासाठी तासन्‌तास ताटळकत बसावे लागत आहे. 

आरटीओ कॅम्पची अवस्था; इंटरनेट कनेक्‍शनसह विजेचा अडथळा; नागरिकांचे हाल

कोल्हापूर - शहरासह ग्रामीण भागातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) कॅम्प म्हणजे सक्षम अधिकारी आणि ढिसाळ यंत्रणा अशी अवस्था झाली आहे. ऑनलाइन प्रक्रियेसाठी इंटरनेट कनेक्‍शनसह वीजपुरवठ्याच्या अडथळ्यामुळे नागरिकांना वाहन परवान्यासाठी तासन्‌तास ताटळकत बसावे लागत आहे. 

नागरिकांचे श्रम, वेळ आणि पैशाची बचत व्हावी, या उद्देशाने आरटीओ कार्यालयामार्फत कॅम्प घेतले जातात. येथे वाहनांचे कच्चे आणि पक्के परवाने काढून देण्याचे प्रामुख्याने काम केले जाते. सध्या चंदगड, गडहिंग्लज, मुरगूड, राधानगरी, पेठवडगाव, वारणा, मलकापूर, इचलकरंजी, जयसिंगपूर आदी ठिकाणी कॅम्प घेतले जातात. दिवसभराच्या कॅम्पमध्ये सरासरी १६० कच्चे, तर १८० पक्के वाहन परवाने काढून दिले जातात. घराजवळ आणि ऑनलाइन परीक्षेशिवाय कच्चा वाहन परवाना काढता येत असल्याने कॅम्पला नागरिक पसंती देऊ लागले आहेत. कॅम्पसाठी ऑनलाइन अपॉईंटमेंट घेणे उमेदवाराला बंधनकारक करण्यात आले आहे.

महिन्याभरापूर्वी राज्यातील संपूर्ण आरटीओ कार्यालये ऑनलाइन करण्यात 
आली आहेत. 

कॅम्पसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना व लिपिकांना उमेदवारांची ऑनलाइन अपॉईंटमेंट, कागदपत्रांची छाननी, स्कॅनिंग, अपलोडिंगनंतर उमेदवारांची तोंडी आणि वाहन चालविण्यासंबधीची चाचणी आदी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यासाठी लागणारी इंटरनेट सुविधा तत्काळ उपलब्ध होत नाही. उपलब्ध झाली तर त्याची गती अत्यंत मंद असते, अगर कालांतराने ती बंद पडते. इंटरनेट उपलब्ध झाले तर संबंधित शहर व गावात विद्युत पुरवठा उपलब्ध नसतो. शिबिरात एका उमेदवाराचे काम पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्याचे काम हाती घेता येत नाही. त्यामुळे सकाळी परवाना काढण्यासाठी आलेल्या उमेदवाराला फक्त ढिसाळ यंत्रणेमुळे उशिरापर्यंत ताटकळत बसावे लागते. ऑनलाइन कामकाजात आजचे काम बदलणाऱ्या तारखेमुळे उद्या करता येत नाही. उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी आणि आजचे काम आजच करण्यासाठी अधिकाऱ्यांना स्वतःच्या मोबाइलच्या इंटरनेटचा आधार घ्यावा लागत आहे. कार्यालयाने कॅम्पसाठी लागणारी आवश्‍यक यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामीण नागरिकांतून जोर धरू 
लागली आहे.

कॅम्पमधील उणिवा...
इंटरनेट कनेक्‍शनची अनियमितता
खंडित होणारा विद्युत पुरवठा
आजचे काम आजच करण्याचे बंधन 
कागदपत्रे तपासणे, अपलोडिंगसह परीक्षा घेण्याची जबाबदारी एकाकडेच.

Web Title: rto office problems