महाबळेश्‍वर, तापोळ्यात आरोग्यसेवा ठप्प

रविकांत बेलोशे
शुक्रवार, 15 जून 2018

भिलार - शासनाचा आरोग्य विभाग आणि बेल एअर यांच्यातील आरोग्य केंद्रे चालवण्यास देण्याच्या हस्तांतरणाचे घोंगडे अद्यापही भिजत पडल्याने महाबळेश्वर तालुक्‍यातील तापोळा, तळदेव, महाबळेश्वर येथील आरोग्यसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. आरोग्य विभागाने रुग्णांना अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे. 

भिलार - शासनाचा आरोग्य विभाग आणि बेल एअर यांच्यातील आरोग्य केंद्रे चालवण्यास देण्याच्या हस्तांतरणाचे घोंगडे अद्यापही भिजत पडल्याने महाबळेश्वर तालुक्‍यातील तापोळा, तळदेव, महाबळेश्वर येथील आरोग्यसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. आरोग्य विभागाने रुग्णांना अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे. 

शासनाने नुकतीच तापोळा, तळदेव ही प्राथमिक आरोग्य केंद्रे व महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालय प्रायोगिक तत्त्वावर बेल एअर या संस्थेला चालवण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला. हा प्रयोग दुर्गम भागातील रुग्णांच्या आरोग्याच्यादृष्टीने हितकारक असल्याचे बोलले जात आहे. परंतु, या निर्णयामुळे अगोदरच बोजवारा उडालेल्या आणि घायकुतीला आलेल्या आरोग्य यंत्रणेने ‘सुटलो बुवा’ म्हणत सुस्कारा सोडला. या निर्णयाच्या दिवासापासून आरोग्य यंत्रणेने आपल्या सर्व मोहिमा थंड केल्या आहेत, तर सर्व कर्मचाऱ्यांनी ‘काळ्या पाण्याच्या शिक्षेतून मुक्तता’ मिळाल्याच्या अविर्भावात कामाला ‘फुलस्टॉपच’ दिला आहे. आपला बाडबिस्तरा गुंडाळला आहे. परिणामी ही केंद्रे बंद आहेत. परिणामी पावसाळ्याच्या तोंडावर येथील जनतेला खासगी रुग्णालयांत जावून सेवा घ्यावी लागत आहे.  

तापोळा व तळदेव या दोन्ही ठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. काही कर्मचारी रजेवर तर काही कर्मचारी हजरच नसल्याने दोन्ही आरोग्य केंद्रे सध्यातरी ‘शोपिस’ ठरली आहेत. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी नसल्यामुळे या विभागातील लसीकरण प्रक्रिया कोमात गेली आहे. 

त्यामुळे बालकांच्या आरोग्याबरोबर त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नाहीत, त्याठिकाणी वरिष्ठ तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सेवा देण्याची आवश्‍यकता असताना येथील शासनाने एकतर निर्णयानुसार ही केंद्रे तातडीने ‘बेल ऐअर’कडे हस्तांतरित करावीत, अन्यथा स्वतः आरोग्य यंत्रणेने सेवा सुरळीत करावी अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशारा या परिसरातील नागरिकांनी केला आहे.

आरोग्य केंद्रे चालवण्यास देण्याच्या निमित्ताने आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. हस्तांतरण होईपर्यंत तरी आरोग्यसेवा देण्यासाठी कर्मचारी जागेवर ठेवणे गरजेचे आहे. परंतु, कुणालाही न जुमानता सत्ताधारी व अधिकाऱ्यांची मनमानी जनतेच्या जिवावर उठली आहे. त्यामुळे आरोग्याचे तीन-तेरा वाजले आहेत. आरोग्य सेवेअभावी कुणाचे बरेवाईट झाल्यास त्याचा जाब सत्ताधारी व आरोग्य यंत्रणेला द्यावा लागेल.
- धोंडिरामबापू जाधव, ज्येष्ठ नेते, शिवसेना

Web Title: rural hospital health service stop