मंत्रिपद कुणाच्या मेहेरबानीने नाही - खोत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

कोल्हापूर - "ओठावर मिशा नसताना मी चळवळीत आलो, मिशा आल्यानंतर चळवळीत आलेल्यांनी मला शिकवण्याची गरज नाही. मी डुलणारा माणूस नाही, तर लढणारा वाघ आहे. "व्हॉट्‌सऍप' आणि फेसबुकच्या माध्यमातून मी नेता झालेलो नाही, तर येरवड्याच्या जेलमधून तयार झालेला नेता आहे. मला मिळालेले मंत्रिपद हे कुणाची मेहेरबानी नाही, तर चळवळीने मला हे पद दिले,' अशी जोरदार टोलेबाजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी करत संघटनेच्या नेत्यांना कानपिचक्‍या दिल्या. 

कोल्हापूर - "ओठावर मिशा नसताना मी चळवळीत आलो, मिशा आल्यानंतर चळवळीत आलेल्यांनी मला शिकवण्याची गरज नाही. मी डुलणारा माणूस नाही, तर लढणारा वाघ आहे. "व्हॉट्‌सऍप' आणि फेसबुकच्या माध्यमातून मी नेता झालेलो नाही, तर येरवड्याच्या जेलमधून तयार झालेला नेता आहे. मला मिळालेले मंत्रिपद हे कुणाची मेहेरबानी नाही, तर चळवळीने मला हे पद दिले,' अशी जोरदार टोलेबाजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी करत संघटनेच्या नेत्यांना कानपिचक्‍या दिल्या. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी शेतकरी कर्जमुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाच्या वेळी खोत बोलत होते. खोत मोर्चाला येणार का नाही याविषयी संभ्रमावस्था होती; पण सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्यांनी मोर्चात हजेरी लावून यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देताना त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला. याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचे सांगत ते कर्जमुक्तीला अनुकूल असल्याचा दावाही केला. 

खोत म्हणाले, ""मोर्चाला मी येणार का नाही, अशा बातम्या सकाळपासून सुरू होत्या; पण शेतकऱ्यांचा व संघटनेचा प्रतिनिधी म्हणूनच सरकारमध्ये आहे. 25 वर्षे शेतकऱ्यांचे प्रश्‍न घेऊन रस्त्यावरची लढाई मी करत आहे. मी व खासदार राजू शेट्टी यांनी एकत्रित अनेक आंदोलने केली. कधी तुरुंगात, तर कधी लाठ्याकाठ्याही खाल्या. आता या राज्यातला शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे. मी या शेतकऱ्यांचाही प्रतिनिधी म्हणून काम करत आहे.'' 

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह विरोधकही कर्जमुक्तीची मागणी करत आहेत; पण त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात ही मागणी नव्हती, असे सांगून खोत म्हणाले, की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा म्हणून मी व शेट्टी यांनी तुळजाभवानीला साकडे घालून आंदोलन सुरू केले. आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली, तेही कर्जमुक्तीला अनुकूल आहेत. प्रामाणिकपणे कर्ज फेडलेल्यांनाही न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. 

शेट्टी-खोत शेजारी शेजारी 
मोर्चा दुपारी तीनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचला. खोत साडेचारच्या सुमारास मोर्चात सहभागी झाले. व्यासपीठावर शेट्टी-खोत शेजारी शेजारीच बसले होते. आल्यानंतर त्यांच्यात काय ते संभाषण झाले; पण नंतर त्यांच्यात अबोलाच राहिला. आपल्या दहा मिनिटांच्या भाषणात खोत यांनी अतिशय आक्रमकपणे टीकाकारांचा समाचार घेतला. दोन दिवसांपूर्वीच शेट्टी यांनी "सदाभाऊ म्हणजे संघटना नव्हे,' असे सांगत त्यांना डीवचण्याचा प्रयत्न केला होता. खोत हे मंत्री झाल्यापासून या दोघांत फारसे सख्य नाही याची प्रचिती अनेकदा आली. या पार्श्‍वभूमीवर खोत यांनी आपल्या भाषणात कोणाला लक्ष्य केले, याची चर्चा सभास्थळी सुरू होती. 

Web Title: Sadabhau Khot statement