नाराज शेट्टींनी यादी जाहीर केली नसती 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

सांगली - चळवळीची मशागत चांगली झाली असेल तर पेरणी करू नकोस असे मी मुलाला कसे सांगू शकतो?, असा सवाल पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी केला. 

सांगली - चळवळीची मशागत चांगली झाली असेल तर पेरणी करू नकोस असे मी मुलाला कसे सांगू शकतो?, असा सवाल पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी केला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी (ता. 13) सदाभाऊंनी मुलाला उमेदवारी देणे अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले होते. या पार्श्‍वभूमीवर आज मंत्री खोत यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना "शेट्टी नाराज असते तर रयत विकास आघाडीची पहिली यादी जाहीर करायला आलेच कसे असते?,' असाही सवाल केला. ते म्हणाले, ""मुलगा सागरची उमेदवारी रयत विकास आघाडीचे नेते शिवाजीराव नाईक व अन्य नेत्यांच्या आग्रहास्तव पुढे आली. बागणी जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या मुलाची उमेदवारी आहे. त्याच्याविरोधात लढत देऊ शकेल असा उमेदवार दिला पाहिजे, असा आग्रह नेत्यांनी धरला. सर्वांच्या संमतीने सागरचे नाव पुढे आले. मुलाला प्रस्थापित करण्यासाठी मी राजकारणात आलेलो नाही. मात्र चळवळीची मशागत चांगली झाले असेल तर त्यात पेरणी करू नको, असे मी मुलाला कसे सांगू शकतो.'' 

संघटना सांगेल तेव्हा सदाभाऊंना राजीनामा द्यावा लागेल या शेट्टींच्या वक्तव्यावर मंत्री खोत म्हणाले, ""सत्ता की संघटना हा सध्या माझ्यासमोरचा प्रश्‍न नाही. भाजप सरकारचे काम चांगले चालले आहे. सरकारमध्येही मी शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच काम करतो. त्यांच्या सूचनांचा विचार करून आम्ही सरकारमध्ये अंमलबजावणी करीत असतो. त्यामुळे ते नाराज असतील असे मला वाटत नाही.'' 

भाजप संघटनेच्या कार्यकर्त्यांना फूस लावत आहे. या शेट्टींच्या आरोपावर त्यांनी तसे काही माझ्या निदर्शनास आलेले नाही असे सांगितले. 

Web Title: sadhabhau khot