शाहूपुरी पोलिस ठाण्यात ‘सैराट’ हाणामारी

शाहूपुरी पोलिस ठाण्यात ‘सैराट’ हाणामारी

कोल्हापूर - शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री ‘सैराट’ हाणामारीचा प्रकार घडला. प्रेमविवाह करून पोलिस ठाण्यात हजर झालेल्या तरुणीच्या भावाने बहिणीसह तिचा पती व पोलिसांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल शुभम रवींद्र शिंगटे (वय २३, मर्ढे, ता. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला. कॉन्स्टेबल नारायण कोरवी यांनी याबाबत फिर्याद दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मर्ढे (सातारा) येथील एक तरुणी शिक्षणानिमित्त कोल्हापुरात वास्तव्याला होती. तिच्यासोबत महाविद्यालयात शिकणाऱ्या जाधववाडी येथील एका तरुणाशी ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. काही दिवसांपूर्वी दोघेही पसार झाले होते. मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद तरुणीच्या आई-वडिलांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली होती. गुरुवारी दोघेही लग्न करून पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी याची माहिती तरुणीच्या कुटुंबीयांना दिली. त्यानुसार तिचे आईवडील व भाऊ शुभम शाहूपुरी पोलिस ठाण्यात आले.

त्यांचा या विवाहाला विरोध होता; मात्र दोघेही सज्ञान असल्याने 
पोलिसांनी तरुणीच्या कुटुंबीयांची समजूत काढत तिचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली. पोलिस नारायण कोरवी व महिला कर्मचारी बागुल तरुणीचा जबाब नोंदवत होते. याच दरम्यान संतप्त शुभम शिंगटे याने तरुणीच्या कानशिलात लगावली. तिच्या पतीलाही मारहाण केली. यामुळे गोंधळ उडाला. कोरवी यांच्यासह त्यांचे सहकारी शुभमला रोखण्यासाठी धावले असता त्याने त्यांनाही धक्काबुक्की करत किरकोळ मारहाण केली. अखेर पोलिस ठाण्यातील इतर कर्मचाऱ्यांनी शुभमला बाजूला घेतले.

दरम्यान, या प्रकरणी शिंगटेवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्याला अटक केली. या ‘सैराट’ हाणामारीची चर्चा शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com