कल्पनेच्या भावविश्‍वाला रंगरेषांची छटा...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

सातारा - निरभ्र आकाश, थंड हवेची झुळूक आणि कोवळ्या उन्हांनी उल्हसित करणाऱ्या वातावरणात मुलांच्या हातातील कुंचले लीलया फिरू लागले. पाहता पाहता शुभ्र कागदावर रेषा आणि इंद्रधनुष्याला लाजवतील अशा विविध रंगांच्या ठिपक्‍यांतून आकारास येणाऱ्या चित्रांनी बालचमूंच्या कल्पनेच्या भावविश्‍वाला जणू रंगरेषांची छटाच मिळाली. याचे निमित्त ठरले ते ३३ व्या ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेचे. 

सातारा - निरभ्र आकाश, थंड हवेची झुळूक आणि कोवळ्या उन्हांनी उल्हसित करणाऱ्या वातावरणात मुलांच्या हातातील कुंचले लीलया फिरू लागले. पाहता पाहता शुभ्र कागदावर रेषा आणि इंद्रधनुष्याला लाजवतील अशा विविध रंगांच्या ठिपक्‍यांतून आकारास येणाऱ्या चित्रांनी बालचमूंच्या कल्पनेच्या भावविश्‍वाला जणू रंगरेषांची छटाच मिळाली. याचे निमित्त ठरले ते ३३ व्या ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेचे. 

‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेस नेहमीप्रमाणे यावर्षीही शालेय विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. कडाक्‍याच्या थंडीचा कडाका वाढला असतानाही मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेत विद्यार्थी सहभागी झाले होते. जिल्ह्यातील ९५ केंद्रांवर ही स्पर्धा झाली. 

मुलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या स्पर्धेबाबत शालेय विद्यार्थ्यांत आणि पालकांमध्येही कमालीची उत्सुकता असते. त्यामुळे हजारो विद्यार्थी आणि शेकडो शाळांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. सध्या थंडीचे दिवस असूनही भल्या सकाळी विद्यार्थ्यांची पावले स्पर्धा केंद्राकडे वळाली. आपले रंग साहित्य घेऊन विद्यार्थी लगबगीने केंद्रांवर दाखल झाले. सकाळी पहिल्या सत्रात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दोन गटांची स्पर्धा झाली. हे विद्यार्थी उत्साहाने स्पर्धेत सहभागी झाले होते. आवडते विषयच चित्रासाठी असल्याने विद्यार्थी आपल्या कल्पनेतून चित्रे रेखाटत त्यात समर्पक रंगभरणी करण्यात रमून गेले.

दुसऱ्या सत्रात पहिली ते चौथीच्या स्पर्धेवेळी तर सर्वांना अनोखे दृष्य पाहायला मिळाले. पहिली, दुसरीचे छोटे विद्यार्थी आपले आजोबा, दीदी, मम्मी, पप्पांचे बोट धरून केंद्रांवर येत होती. थंडीमुळे उबदार स्वेटर घालून आलेली ही छोटी छोटी मुले चित्रांचे विषय आणि कागद हातात येताच निष्णात चित्रकाराच्या अविर्भात आपल्या कल्पना कागदावर उतरवू लागली.

पहिली दुसरीच्या ‘अ’ गटातील मुलांनी मोर, कार्टुन काढण्यास तर तिसरी चौथीच्या ‘ब’ गटातील मुलांनी आईस्क्रीमचे दुकान, बागेत खेळणारी मुले चितरण्यास पसंती दिली. पाचवी ते सातवीच्या ‘क’ गटातील मुलांनी गणेशोत्सवाची मिरवणूक, शेतात काम करणारे शेतकरी आणि आठवी ते दहावीच्या ‘ड’ गटातील विद्यार्थ्यांनी परसबाग, रेल्वेचे क्रॉसिंग गेट, सायकलचे दुकान काढण्यास प्राधान्य दिले होते.

विशेष सहकार्य
‘सकाळ’च्या चित्रकला स्पर्धेसाठी कला सागर ॲकॅडमी, वाई/फलटण, पालेकर फूड प्रॉडक्‍टस्‌ प्रा. लि. सातारा, जंगल हूड (मुलांच्या आवडीचा अनोखा डायनासोर पार्क) करंदी, नसरापूर (पुणे) यांनीही विशेष सहकार्य केले आहे.

‘सकाळ माध्यम समूहा’चा चित्रकला स्पर्धा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. मुलांना त्यांच्या भावना व्यक्‍त करण्याची उत्तम संधी यातून मिळाली. ‘सकाळ’ सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्रम राबवत असते. स्पर्धेमुळे मुलांची कला आणि मुलांच्या कलेमुळे स्पर्धा बहरत जात आहे. स्पर्धेतील विषय मुलांना आवडत असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरील भाव सांगत होते.
- सचिन जाधव,  सहायक संचालक, कौशल्य विकास विभाग

चित्रकला स्पर्धेतून मुलांतील आत्मविश्‍वास वाढीस लागत आहे. ‘सकाळ’ची चित्रकला स्पर्धा कलागुणांच्या निर्मितीचा उगम करणारी आहे. लहानपणात मुलांना कला ओळखण्याची आणि पुढे ती कला जोपासण्याची संधी या स्पर्धेतून मिळत आहे. शहरांबरोबरच ग्रामीण भागातील मुलेही स्पर्धेत सहभागी होऊन उत्कृष्टता सिद्ध करत आहेत. 
- एन. एल. क्षीरसागर, मुख्याध्यापक, रा. ब. काळे जीवन शिक्षण मंदिर, सातारा

सकाळ पेपर मुलांसाठी अनेक स्तुत्य उपक्रम राबवत असतो. चित्रकला स्पर्धेमुळे मुलांच्या कल्पनाशक्‍तीला वाव मिळत असून, त्यांना नवनिर्मिती करता येते. ‘सकाळ’चे हे ३३ वे वर्ष आहे. देशातील सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा म्हणून या स्पर्धेची ओळख झाली आहे. या स्पर्धेने अनेक चित्रकार महाराष्ट्राला दिले आहेत अन्‌ मिळत राहतील. धन्यवाद सकाळ.
- बाळासाहेब कचरे,  कलाशिक्षक, सातारा

Web Title: Sakal Drawing Competition