राळेगणसिद्धीतील नापासांच्या शाळेचा निकाल शंभर टक्के

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

नापास विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश देणाऱ्या राळेगणसिद्धी येथिल श्री संत निळोबाराय विद्यालयाचा दहावी व बारावीचा निकाल शंभर टक्के लागला असून तब्बल दहा विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले आहेत. 

राळेगणसिद्धी- नापास विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश देणाऱ्या राळेगणसिद्धी येथिल श्री संत निळोबाराय विद्यालयाचा दहावी व बारावीचा निकाल शंभर टक्के लागला असून तब्बल दहा विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले आहेत. 

कु. मनाली गुंड हिने ९६.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकवला आहे. प्रणित गायकवाड याने ९५.८० गुणांसह द्वितीय तर कु. भार्गवी भोसले ९३.६० गुणांसह तृतीय क्रमांकाचे यश संपादन केले आहे. याशिवाय कु. स्मृती नरसाळे ९३.२०, प्रतीक पठारे ९२.२०, अखिल ढवळे ९१.६०, कु. वैष्णवी रासकर ९१.४०, वैभव कुंजीर ९१.२०, प्रतीक मापारी ९०.८० तर कु. पूजा तरटे ९०.४० गुणांसह नव्वद टक्क्यांहून अधिक गुण संपादन करणारे तब्बल दहा विद्यार्थी आहेत. १४४ विद्यार्थी या विद्यालयातून दहावीच्या परीक्षेला बसले होते. पैकी ५१ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर ६३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असल्याने विद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.यातील ३० विद्यार्थ्यांनी रेखाकला परीक्षेत प्राविण्य मिळविलेले असल्याने त्यांना कला विषयाच्या वाढीव गुणांचा लाभ मिळाला.

विद्यालयाच्या विनाअनुदानित बारावी विज्ञान शाखेचा निकालही शंभर टक्के लागला असून कु. अश्विनी भोसले हिने ७७.६९ गुणांसह प्रथम क्रमांक प्राप्त केला असून सुरेश घुले ७४ टक्क्यांसह द्वितीय तर कु. प्रियंका भोसले ही ७२.६० गुणांसह तृतीय क्रमांकावर आहे. बारावी कला शाखेचा निकाल ९८ टक्के लागला असून कु. प्रियंका डंबाळे ७७.८३, कु. काजल फुलपगर ७७.६८ तर कु. मयुरी ढोरमले ७६ या तीन मुलींनी पहिले तीन क्रमांक पटकावले आहेत. 

पाचवी ते बारावी पर्यंत सुविधा असलेल्या या विद्यालयात एकूण एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पैकी तिनशे विद्यार्थी वसतिगृहात राहत असून ते महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील आहेत. १९८९ पासून या विद्यालयात प्रवेश देताना नापास किंवा खोडकर विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश देण्याची परंपरा आहे. त्यामुळे ही शाळा 'नापासांची शाळ' म्हणून प्रसिद्ध आहे. अभ्यासात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी इथे वर्षभर विविध उपक्रम राबवून विशेष मार्गदर्शन करण्यात येते. तसेच पाचवी ते बारावी अशा सर्व वर्गात लोकवर्गणीतून ही शाळा संपूर्ण डिजीटल करण्यात आलेली असून सीसीटिव्ही, इलर्निंग, बायोमेट्रिक अशा आधुनिक सुविधा असल्याची माहिती प्राचार्य सोमनाथ वाकचौरे यांनी दिली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, संस्थेचे अध्यक्ष सदाशिव मापारी, प्राचार्य सोमनाथ वाकचौरे, पर्यवेक्षक दिलीप देशमुख आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: sakal news breaking news ralegansiddhi news ssc result news