‘रोटरी सनराईज’तर्फे अनिलला मदतीचा हात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

कोल्हापूर -  विजेचा शॉक लागून छपरावरून पडल्यानंतर गंभीर जखमी झालेला आणि सीपीआरमध्ये गेले अनेक दिवस बेडवर असलेल्या अनिल गारवे यांच्या मदतीसाठी आता कोल्हापूरकरांचे हात सरसावले आहेत. अनिलच्या उपचारासाठी त्याच्या आईने ‘सकाळ’मधून मदतीचे आवाहन केले होते. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या कुटुंबाला आधार देण्यासाठी रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर सनराईज या सामाजिक संस्थेने तातडीची मदत म्हणून १५ हजार रुपयांचा धनादेश त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केला.

मित्राच्या घराचे बांधकाम पूर्ण करून उतरताना मुख्य वीज वाहिनीचा शॉक लागल्याने गवंडी कारागीर अनिल गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार केले. त्या त्या हॉस्पिटलचे बिल भागवताना गावातील नागरिकांनी हातभार लावला. सिद्धगिरी आणि डी. वाय. पाटील हॉस्पिटल या दोन्हीचे बिलापोटी सुमारे अडीच लाख रुपयापर्यंतची रक्कम लोक वर्गणीतून भरली; पण पुन्हा मणक्‍याचा त्रास सुरू झाल्यानंतर मिरजेत खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील बिल भागवण्यासाठी अनिलच्या आईने घर विकले; पण दुर्दैवाने येथीलही उपचारांना फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे चांगल्या पण मोफत उपचारांच्या अपेक्षेने अनिलला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. येथे त्याच्यावर गेले दीड महिना उपचार सुरू आहेत. त्याला अत्याधुनिक उपचारांची गरज आहे, पण सध्या खाण्यापिण्यासाठीही पैसे जवळ नसलेल्या या कुटुंबाकडे डॉक्‍टरने लिहून दिलेल्या गोळ्या औषधे आणणेही शक्‍य होत नसल्याने या मातेने आपल्या लेकराच्या जीवनासाठी कोल्हापूरकरांकडे मदतीचा हात पसरला आहे. याला प्रतिसाद देत रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर सनराईजने १५ हजार रुपयांची मदत केली. 

आणखी मदतीचे आश्‍वासन
क्‍लबचे प्रेसिडेंट राहुल रत्नाकर कुलकर्णी, सचिव ऋषीकेश खोत, राहुल सुभाष कुलकर्णी यांनी ही मदत देऊ केली, तर चंदन मिरजकर यांनी वैयक्‍तिक दोन हजार रुपयांची मदत अनिलच्या आईकडे दिली. राहुल कुलकर्णी यांनी ही मदत प्रातिनिधिक रूपात करत असून अन्य संस्था आणि क्‍लबद्वारेही या कुटुंबाला शक्‍य तितकी अधिक मदत करण्याचे आश्‍वासन दिले.

Web Title: sakal news impact Anill help by Rotary Sunrise