कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांसमोर पुजाऱ्याला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

चंद्रकांतदादांनी श्री अंबाबाईला घागरा-चोळी नेसविणे हे चुकीचे असून याबद्दल अजित ठाणेकर यांनी दोन दिवस आत्मक्लेश करावा असे सांगून ठाणेकर यांना दोन दिवस मंदिरात प्रवेशबंदी करावी, असा आदेश दिला. 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव आंदोलनप्रश्नी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविलेल्या बैठकीत मंदिरातील पुजारी अजित ठाणेकर यांच्यावर आंदोलकांनी चप्पलफेक केली. तसेच त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चंद्रकांतदादांच्या सूचनेनुसार अखेर ठाणेकर यांना पोलीस बंदोबस्तात बैठकीबाहेर काढून घरी पाठविण्यात आले. 

चंद्रकांतदादांनी आज (गुरुवार) दुपारी पुजारी हटाव संघर्ष समिती, सर्वपक्षीय नेते, प्रमुख सामाजिक कार्यकर्ते तसेच पुजारी यांची बैठक बोलाविली होती. प्रचंड तणावाच्या वातावरणात ही बैठक सुरु झाली. दोन्ही बाजूंचे बोलणे ऐकून घेतल्यानंतर चंद्रकांतदादांनी श्री अंबाबाईला घागरा-चोळी नेसविणे हे चुकीचे असून याबद्दल अजित ठाणेकर यांनी दोन दिवस आत्मक्लेश करावा असे सांगून ठाणेकर यांना दोन दिवस मंदिरात प्रवेशबंदी करावी, असा आदेश दिला. 

चंद्रकांतदादांनी हे सांगत असताना ठाणेकर हे हसत असल्याचे पाहून काही आंदोलकांना संताप अनावर झाला. काहींनी त्यांच्या दिशेने चप्पलफेक केली तर काहींनी त्यांना बैठकीतच मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे वातावरण अतिशय तणावपूर्ण बनले. पालकमंत्र्यांनी ठाणेकर यांना पोलीस बंदोबस्तात घरी पाठविले.

Web Title: Sakal news kolhapur news mahalaxmi temple controversy

टॅग्स