पूरग्रस्तांच्या दारी मदत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

महापुराच्या थैमानानंतर निवारा केंद्रात स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे हजारो हात पुढे सरसावले आहेत. रोख रकमेसह जीवनावश्‍यक साहित्यही अनेक संस्थांनी दिले असून आजपासून प्रत्यक्ष पूरग्रस्तांना थेट त्यांच्या निवारा केंद्रात जावून साहित्य वितरणाला प्रारंभ झाला.

कोल्हापूर - महापुराच्या थैमानानंतर निवारा केंद्रात स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे हजारो हात पुढे सरसावले आहेत. रोख रकमेसह जीवनावश्‍यक साहित्यही अनेक संस्थांनी दिले असून आजपासून प्रत्यक्ष पूरग्रस्तांना थेट त्यांच्या निवारा केंद्रात जावून साहित्य वितरणाला प्रारंभ झाला.

रूई (ता. हातकणंगले) येथील चारशे कुटुंबांना पुराचा फटका बसला आहे. ही कुटुंबे गेले दहा दिवस गावातील शाळांत स्थलांतरित झाली असून त्यांना आज ब्लॅंकेट, चटई याबरोबरच इतर जीवनावश्‍यक साहित्य देण्यात आले.

त्यासाठी सह्याद्री युवा फाउंडेशनचे विशेष सहकार्य मिळाले. जयसिंगपूर येथील निवारा केंद्रातही शेकडो पूरग्रस्त स्थलांतरित करण्यात आले आहेत. त्यांच्यासाठी आवश्‍यक जीवनावश्‍यक साहित्य आपत्ती निवारण विभागाचे अधिकारी मेघन देसाई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. अडचणीच्या काळात धावून आलेल्या ‘सकाळ रिलीफ फंडा’चे या वेळी पूरग्रस्तांनी आभार मानले.

देशभरातील आजवरच्या कोणत्याही आपत्तीवेळी ‘सकाळ रिलीफ फंडा’ने नेहमीच पुढाकार घेतला आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा भागात पावसाने थैमान घातले. कोल्हापूर व सांगली ही शहरे आणि दोन्ही जिल्ह्यांतील बहुतांश भाग अजूनही पुराच्या पाण्याच्या विळख्यात आहेत. 

पुरात अवघा संसार वाहून गेलेल्या पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’ने आवाहन केल्यानंतर अनेक मदतीचे हात पुढे आले आहेत. विविध संस्था, संघटनांबरोबरच सेवाभावी व्यक्तींनी थेट ‘सकाळ’च्या कार्यालयात येऊन मदत द्यायला प्रारंभ केला आहे. जीवनावश्‍यक साहित्याची मदत तत्काळ पूरग्रस्तांपर्यंत पोचवली जावू लागली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Relief Fund Help Flood Affected Rui Village