रंग-रेषांच्या जादुई दुनियेत हरवली चिमुकली 

रंग-रेषांच्या जादुई दुनियेत हरवली चिमुकली 

सोलापूर : शाळांचा सुट्टीचा दिवस अन्‌ राजमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंतीचा संगम साधत "सकाळ'तर्फे आयोजित चित्रकला स्पर्धा आज (रविवारी) शहरातील 17 केंद्रावर झाली. गुलाबी थंडीत रंग-रेषांच्या जादुई दुनियेत विद्यार्थी हरवून गेले होते. रंग-रेषा अन्‌ आकाराच्या माध्यमातून चिमुकली व्यक्‍त झाल्याचे चित्र पहायला मिळाले. या वेळी स्पर्धेसाठी उपस्थित शिक्षक, पालकांनी "सकाळ'चे विशेष आभार मानले. 

पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी (अ गट) बालपणात दिसलेला फुलपाखरु हुबेहुब कागदावर रेखाटला होता तर काहींनी त्यांच्या वाढदिवसाचा केक काढला. वाघ, बैल, गाय यांचे काल्पनिक चित्रही रेखाटले. दुरचित्रवाणीवरील मोटू और पतलू काढून काही विद्यार्थ्यांनी बुध्दिमत्तेची चुणूक दाखवून दिली. नुकताच पार पडलेल्या ख्रिसमसची आठवण करुन काही विद्यार्थ्यांनी जोकरचे चित्रही काढले. या चित्रकला स्पर्धेतून बहूतांश विद्यार्थ्यांना त्यांच्या आजीचीही आठवण झाली आणि आजीबाई प्रत्यक्षात कागदावर अवतरल्याचेही चित्र पहायला मिळाले. तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी पाळीव प्राण्यांबरोबर खेळतानाचे, आकाशात पतंग उडवितानाचे चित्र काढले. वाढदिवसाची पार्टी व त्यांचे आवडते कार्टूनही रेखाटले. उंटावरुन अथवा हत्तीवरुन रपेट मारतानाचे चित्र काढून चिमुकल्यांनी त्यांची आवड व्यक्‍त केली. राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने अनेक विद्यार्थ्यांना छत्रपती शिवरायांचा किल्ला आठवला आणि त्यांनी हुबेहुब किल्ला रेखाटल्याचेही पहायला मिळाले. 

इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना (ड गट) सहा प्रकाराच्या चित्रांचे पर्याय दिले होते. परंतु, सर्वाधिक विद्यार्थ्यांनी चंद्रयान मोहीमेवरील चित्राला प्राध्यान दिल्याचे पहायला मिळाले. या चित्रकला स्पर्धेतून त्यांच्या मनातील चंद्रयान कागदावर रेखाटल्याचेही दिसून आले. आकाश, अवकाशातील तारे, सुर्य आणि त्यातून जात असलेले चंद्रयान विद्यार्थ्यांनी चित्राच्या माध्यमातून काढून अनेकांना आश्‍चर्यचकीत केले. 

ठळक बाबी... 
राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंती व चार हुतात्मा दिनानिमित्त या महापुरुषांना शाळांमध्ये अभिवादन 
चित्रकला स्पर्धेसाठी मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले सहकार्य 
गुलाबी थंडीत विद्यार्थी हरवले रंग- रेषा- आकाराच्या दुनियेत : चित्रातून व्यक्‍त झाली चिमुकली 
राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त बाळे येथील राजीव प्राथमिक शाळेतील मुलींची जिजाऊच्या साडीत हजेरी 
पर्यावरण, अंतराळ मोहीम (चंद्रयान), वृक्षारोपणाच्या चित्रांना चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती 
चिमुकल्यांना चित्रकला स्पर्धेसाठी शाळेत घेऊन आलेल्या पालकांना झाली बालपणाची आठवण 

विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश 
सकाळची गुलाबी थंडी अन्‌ आजूबाजूचे निसर्गरम्य वातावरण, शाळा परिसरातील हवेची झुळूक अन्‌ झाडांची गळणारी पाने पाहून पाचवी ते सातवीच्या (क गट) विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करतानाची सर्वाधिक चित्रे काढली. पुण्यात सकाळ तर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेची आठवण करीत काहींनी मॅरेथॉनचेही चित्र काढले तर काहींनी थंडीमुळे शेकोटीभोवतालचे दृश्‍य चित्राच्या माध्यमातून रंगवले. बहूतांश विद्यार्थ्यांनी पाण्याखालची जीवसृष्टीची कल्पना करीत आपले भावविश्‍व कागदावर रेखाटले. सर्वाधिक महत्त्वाची बाब म्हणून या गटातील सर्वाधिक विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण गरजेचे असल्याचा संदेश चित्रातून दिल्याचे दिसून आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com