साकूरची मुक्कामी बस रद्द (व्हिडिओ)

विलास कुलकर्णी
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

साकूर मुक्कामी बस गेल्या बुधवारी (ता. 20) रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्थानकप्रमुख अनिल निकम, वाहतूक नियंत्रक श्‍यामलिंग शिंदे व येथे आलेले श्रीरामपूरचे स्थानकप्रमुख बाळासाहेब कोते यांना घेराव घातला होता.

राहुरी : शहरातील बसस्थानकातून रोज सायंकाळी सव्वा पाच वाजता सुटणारी श्रीरामपूर आगाराची साकूर मुक्कामी एसटी बस आज पुन्हा रद्द झाली. याच आठवड्यात ही बस रद्द होण्याची तिसरी वेळ होती. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणारे मासिक पासधारक विद्यार्थी व प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. यापुढे बस रद्द झाली, तर बसस्थानकाच्या नियंत्रण कक्षासमोर आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. 

बस रद्दचा सीलसीला 
साकूर मुक्कामी बस गेल्या बुधवारी (ता. 20) रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्थानकप्रमुख अनिल निकम, वाहतूक नियंत्रक श्‍यामलिंग शिंदे व येथे आलेले श्रीरामपूरचे स्थानकप्रमुख बाळासाहेब कोते यांना घेराव घातला होता. याबाबत "सकाळ'मध्ये गुरुवारी (ता. 21) वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर लगेच शनिवारी (ता. 23) पुन्हा ही बस रद्द झाली. त्यानंतर आजची ही तिसरी वेळ आहे.

प्रवाशांची गैरसोय 
साकूर मुक्कामी बस दुपारी साडेबारा वाजता श्रीरामपूर आगारातून सुटते. दुपारी दोन वाजता राहुरी ते घोडेगाव अशी फेरी करते. नंतर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सायंकाळी सव्वापाच वाजता साकूर मुक्कामी जाते. राहुरी तालुक्‍यातच ही बस सुमारे दोनशे किलोमीटर फिरते. बस रद्द झाल्यानंतर दोनशे किलोमीटर मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होते. 
"सकाळ'शी बोलताना विद्यार्थी धीरज वाबळे, महेश झावरे, अनिकेत औटी (तिघेही रा. ताहाराबाद), अनिकेत शिंदे, आदेश शिंदे (दोघेही रा. दरडगाव थडी), सचिन विधाटे (रा. म्हैसगाव), भीमराज लेंभे, सागर कवटे (रा. कोळेवाडी) यांनी संताप व्यक्त केला. 

पैस भरून सेवा मिळेना 
राहुरी महाविद्यालय, भागीरथीबाई तनपुरे कन्या विद्यालय व लक्ष्मीनारायण औद्योगिक प्रशिक्षण संस्था (राहुरी फॅक्‍टरी) येथे शिक्षण घेणारे 40 मुले-मुली या बसमधून प्रवास करतात. शिवाय 25 ते 30 प्रवासी नेहमीच बसमध्ये असतात. मासिक पासचे पैसे भरून बसची नियमित सेवा मिळत नाही. अचानक बस रद्द झाल्याने घरी परतताना अडचणी येतात. बसच्या वेळेपूर्वी या मार्गावरील खासगी वाहने गेलेली असतात. सर्व मुले गरीब शेतकरी कुटुंबातील आहेत. 

शैक्षणिक नुकसान 
वारंवार बस रद्द झाल्याने घरी जाण्यासाठी खासगी वाहनास भाडे देण्याएवढे पैसे नसतात. मुलींना घरी फोन करून पालकांना बोलवावे लागते. तीस-चाळीस किलोमीटरवरून पालकांना यावे लागते. घरी पोचेपर्यंत रात्रीचे आठ-नऊ वाजतात. दुसऱ्या दिवशी परत राहुरीला येण्यासाठीही बस नसते. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या. 

बस रद्द होणार नाही 
श्रीरामपूर आगारातून आळंदी यात्रेसाठी जादा बस सोडल्या आहेत. त्यामुळे बस रद्द होण्याचे प्रकार होत आहेत. विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होते. यापुढे बस रद्द न करण्याबाबत श्रीरामपूर आगारप्रमुख राकेश शिवदे यांच्याशी बोलणे झाले आहे. 
- अनिल निकम, स्थानकप्रमुख, राहुरी 

नियमित बस पाठविण्याच्या सूचना 
विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी साकूर मुक्कामी बस नियमित पाठविण्याची काळजी घेण्याविषयी श्रीरामपूर आगारप्रमुखांना सूचना दिली जाईल. 
- विजय गिते, विभागीय नियंत्रक, नगर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakura bus canceled