एकावेळी पाच शस्त्रे फिरविणारा संभाजी (व्हिडिओ)

एकावेळी पाच शस्त्रे फिरविणारा संभाजी (व्हिडिओ)

कोल्हापूर -  लाठी, तलवार अथवा भालाफेक करीत असताना एखादा खेळाडू पाहिल्यानंतर अंगावर रोमांच उभे राहतात. मात्र, एकाच वेळी पाच शस्त्रे फिरविणारा खेळाडू पाहिला तर भुवया उंचावल्याशिवाय राहणाऱ्या नाहीत. उजव्या हातात तीन व डाव्या हातात दोन शस्त्रे चढवून ती चालविणे म्हणजे अवघड कला. रामानंदनगरातील संभाजी दत्तू जाधव याने मात्र ती आत्मसात केली आहे. पाच शस्त्रे चालविणारा संभाजी, अशीच त्याची शिवकालीन युद्धकलेतील आखाड्यांत ओळख दृढ झाली आहे.

संभाजीने लाठी, दुहाती लाठी, तलवार, फरी गदका, भाला, बाणा, विटा शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण वस्ताद शामराव अमृतराव जाधव यांच्याकडून घेतले. रांगडा खेळाडू असलेल्या संभाजीला फरी गदका खेळण्यात कमालीची आवड. वस्ताद जाधव यांच्या रामानंदनगरातील घराच्या परिसरातील मोकळ्या जागेत तो रात्री बारापर्यंत सराव करायचा. रात्री आठला सुरू झालेला त्याचा सराव काही मिनिटांसाठी थांबायचा. लिंबू काढणीत तो वाकबगार असल्याने युद्धकलेचा प्रात्यक्षिकांवेळी तोच लिंबू काढणी करायचा. युद्धकलेतील सर्व प्रकार अन्य खेळाडूही करत असल्याने आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करावे, अशी त्याची इच्छा होती. 

वस्ताद जाधव यांनी त्याला पाच शस्त्रे चालविण्याचा वेगळा प्रकार सांगितला. तो त्याला इतका आवडला की, त्याचा सराव त्याने नित्यनेमाने केला. पाच शस्त्रे फिरवताना खांदे भरून येतात किंबहुना चारी दिशेला त्याची फेक करणे हे तितकेसे नक्कीच सोपे काम नाही. महापालिकेत कर्मचारी म्हणून काम करणारा संभाजी आजही ज्या ठिकाणी युद्धकलेची प्रात्यक्षिके असतील तेथे आवर्जून थांबतो. एक दोन प्रकार सादर केल्याखेरीज त्याला चैन पडत नाही. फरी गदका तो आवर्जून खेळतोच; शिवाय पाच शस्त्रे फिरविण्याची कला लोकांसमोर सादर करतो. 

वस्ताद शामराव जाधव यांनी युद्धकलेचे प्रशिक्षण दिले. ज्या-ज्या ठिकाणी युद्धकलेची प्रात्यक्षिके असतील, त्या-त्या ठिकाणी ते मला आवर्जून पाच शस्त्रे चालविण्यास सांगायचे. आजही मला पाच शस्त्रे चालविणे खूप आवडते.
- संभाजी जाधव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com