अंधही अनुभवणार स्पर्शाने अभयारण्य

लुमाकांत नलवडे
रविवार, 23 एप्रिल 2017

कोल्हापूर - जग सुंदर आहे; पण पाहता येत नाही अशा अंधांना आता दाजीपूर अभयारण्य स्पर्शाने अनुभवता येणार आहे. यासाठी तेथे ऍक्रॅलिक ब्रेल लिपीच्या माध्यमातून ठिकठिकाणी फलक उभारले आहेत.

कोल्हापूर - जग सुंदर आहे; पण पाहता येत नाही अशा अंधांना आता दाजीपूर अभयारण्य स्पर्शाने अनुभवता येणार आहे. यासाठी तेथे ऍक्रॅलिक ब्रेल लिपीच्या माध्यमातून ठिकठिकाणी फलक उभारले आहेत.

"सेन्सरी वाइल्ड लाइफ एक्‍स्पिरिअरन्स' या प्रकल्पातून हा अभिनव उपक्रम साकारला आहे. 24 एप्रिलला "प्रेरणा असोसिएशन फॉर ब्लाइंड' आणि वन्यजीव विभागातर्फे 23 जणांची जंगल सफारी होणार आहे. त्यानंतर अंधांसाठी वेळोवेळी सफरीची आयोजन केले जाणार आहे.
दाजीपूर म्हणजे गवा आणि गवा म्हणजे दाजीपूर, असे समीकरण आहे; पण आजपर्यंत केवळ ऐकलेले दाजीपूर अनुभवण्याचा योग अंध व्यक्तीसाठी आता आला आहे. प्रेरणा संस्थेचा वर्धापन दिन 24 एप्रिलला साजरा होत आहे. संस्था "प्रेरणा दिन' म्हणून हा दिवस साजरा करते.

याच प्रेरणा दिनानिमित्त दाजीपूरचे जंगल अंधांनाही अनुभवता येणार आहे. अंधांनाही जंगलाची अनुभूती मिळण्यासाठी वन्यजीव विभाग आणि प्रेरणा संस्थेतर्फे गेले काही दिवस प्रयत्न सुरू होते. आज ते प्रत्यक्षात आले. दाजीपूर अभयअरण्यात आज ऍक्रॅलिक ब्रेल लिपीच्या माध्यमातून जागोजागी फलक उभारले. वनस्पती, त्यांचे अवशेष, वस्तू, प्राण्यांचे ठसे यांचीही अनुभूती अंधांना घेता येण्याची व्यवस्था अभयारण्यात केली आहे. तेथील माहिती केंद्रातही संपूर्ण दाजीपूरच्या माहितीचा नकाशाही ब्रेलच्या माध्यमातून तयार केला आहे. तेथे हात फिरवून अंध व्यक्ती दाजीपूरमधील वैशिष्ट्यांची माहिती घेऊ शकणार आहेत.

प्रेरणा संस्थेच्या माध्यमातून 24 एप्रिलला आयोजित केलेल्या सफारीत ब्रेलवाणी रेडिओच्या माध्यमातून दाजीपूचा इतिहास, वैशिष्ट्ये, वन्यजीव विभागातील अधिकाऱ्यांच्या मुलाखती याचीही माहिती दिली जाणार आहे. साधारण 21 किलोमीटरच्या अंतरातील इत्तंभूत माहिती देण्याचा प्रयत्न प्रेरणा संस्थेच्या माध्यमातून केला जात आहे. यासाठी वन्यजीव विभागाचे मुख्याधिकारी डॉ. बेन आणि विभागीय अधिकारी सीताराम झुरे यांचे सहकार्य लाभले असल्याचे प्रेरणा संस्थेचे सचिव सतीश नावले यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

ऍक्रॅलिक कटिंग मुंबईतून...
राज्यात फक्त मुंबईतच ऍक्रॅलिक ब्रेल लिपीचे कटिंग करून मिळते. कोल्हापुरातील दाजीपुरातील वैशिष्ट्ये आणि इतिहासाची उजळणी होईल, असे फलक ऍक्रॅलिक कटिंगद्वारे प्रेरणा संस्थेने तयार केले. आज सर्व फलक दाजीपुरात उभारले. ऍक्रॅलिक हे कायमस्वरूपी राहणारे आहे म्हणून त्याचा वापर करून फलक उभारले आहेत.

Web Title: Sanctuary will experience blindness