चंदन लागवडीसाठी वन विभाग देणार प्रोत्साहन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात चंदन लागवडीसाठी पोषक वातावरण आहे. चंदनाची लागवड वाढावी याकरिता वन विभागाच्या वतीने कार्यशाळा घेऊन शेतकऱ्यांना माहिती देण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाचे उपवनसंरक्षक संजय माळी यांनी दिली. गेल्या 10 ते 15 वर्षांपासून वनविभागाने जप्त केलेले सहा टन चंदन कर्नाटक सरकारच्या कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेडला देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

सोलापूर वन विभागाकडील चंदनाचा आढावा घेण्यासाठी कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेड कंपनीचे अधिकारी ताराप्रशांत, एस. रवी मंगळवारी सोलापुरात आले होते. आजवर जप्त केलेले चंदन कंपनीने घेऊन जाण्याची जबाबदारी घेतली आहे. कर्नाटक सरकारच्या अंतर्गत कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेड ही कंपनी कार्यरत आहेत. साबणासह विविध उत्पादने ही कंपनी बनविते. शेतकऱ्यांकडून पाच ते नऊ हजार रुपये किलो या दराने चंदन घेण्याची ग्वाही कंपनीने दिली आहे. एक झाड 20 वर्षांमध्ये दीड ते आठ लाख रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्यांना देऊ शकते.

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिकृतपणे चंदन लागवड करून अधिक फायदा मिळवावा, असे उपवन संरक्षक संजय माळी यांनी सांगितले. 

चंदन लागवडीसंदर्भातील माहिती लवकरच कार्यशाळा घेऊन शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतात चंदनाची लागवड केल्यानंतर अंतरपीक म्हणून शेवगा, चिकू, डाळिंब, आंबा, सीताफळ याचेही उत्पादन घेता येऊ शकेल, असे कर्नाटक वन विभागाचे अधिकारी ताराप्रशांत यांनी सांगितले.

Web Title: Sandal plants will Forest department give encourage