एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीची पूर्ण रक्कम न दिल्यास संघर्ष

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

कोल्हापूर - ‘‘कामगारांसाठी एसटी महामंडळाने ३२ ते ४८ टक्के वेतनवाढ जाहीर केली. त्यापोटी ४ हजार ८४९ कोटी देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार वेतनवाढीची रक्कम पूर्ण द्यावी, त्याशिवाय वेतन करारावर सह्या करणार नाही. प्रसंगी एसटी मान्यताप्राप्त संघटना संघर्षाची भूमिका घेईल,’’ असा इशारा मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप शिंदे यांनी आज येथे झालेल्या मेळाव्यात दिला. कामगारांच्या जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते.

श्री. शिंदे म्हणाले, ‘‘महामंडळ प्रशासनाने चार वर्षांच्या वेतन करारासाठी ४ हजार ८४९ कोटी रक्कम देण्याची एकतर्फी घोषणा केली होती. ३२ ते ४८ टक्के वेतनवाढ अपेक्षित होती; मात्र मिळालेली वेतनवाढ कमी असल्याने कामगारांना ती मान्य नाही म्हणून कामगारांनी ८ व ९ जूनला अघोषित काम बंद आंदोलन केले. त्यानंतर सह्याद्री अतिथी गृहावर बैठक झाली.

तीत श्रमिक संघटना पदाधिकारी व एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग होता. तेव्हा वेतनवाढीपोटी ४ हजार ८४९ कोटींचा मान्यताप्राप्त संघटनेने प्रस्ताव द्यावा, असे प्रशासनाने जाहीर केले होते. त्यानुसार संघटनेने ३१ मार्च २०१६ चे मूळ वेतन अधिक १ हजार १९० रुपये या रकमेस २.५७ ने गुणाकार करून येणाऱ्या रकमेची वेतनवाढ द्यावी, असा प्रस्ताव दिला. त्याची प्रशासनाने अद्यापही दखल घेतली नाही.

परिणामी, ४ हजार ८४९ रुपये वेतनवाढीचे वाटप होत नाही. त्यामुळे एसटी कामगारांत नाराजी आहे. त्यासाठी सुधारित वेतनवाढीचा प्रस्ताव मान्य करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. जोपर्यंत प्रशासन प्रस्तावाला मान्यता देत नाही, तोपर्यंत संघटना वेतनवाढ करारावर सही करणार नाही.’’ संघटनेचे जिल्हा पदाधिकारी वसंत पाटील, उत्तम पाटील, एस. बी. मगदूम आदी उपस्थित होते.

लातूरच्या भूकंपात एसटी कामगारांनी मृतदेह उचलण्यासह जखमींना दवाखान्यात पोहोचविले. दुष्काळ, भूकंप व पूरस्थितीत प्रत्येक संकटावेळी एसटी कर्मचारी धावून आले आहेत. माळीणची दुर्घटना एसटी कर्मचाऱ्यांमुळे उघडकीस आली. शिवाय शाळा, महाविद्यालय विद्यार्थ्यांपासून ते नोकरदार व कौटुंबिक घटकांतील लाखो प्रवाशांना एसटी कर्मचारी सुरक्षित सेवा देतात. अशा कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने सेवेत घ्यावे.
- संदीप शिंदे,
राज्याध्यक्ष, मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

Web Title: Sandeep Shinde comment