Islampur: राष्ट्रवादीची पाठ; सभा रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Islampur Municipal Corporation

इस्लामपूर : राष्ट्रवादीची पाठ; सभा रद्द

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर : महाविकास आघाडी सरकारकडून मंजूर असलेल्या सुमारे ११ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यासाठी बोलावण्यात आलेली आजची विशेष सभा रद्द करण्याची नामुष्की ओढवली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी या सभेकडे पाठ फिरवल्याने गणपूर्तीअभावी ही सभा रद्द करण्यात येत असल्याचे नगराध्यक्षांनी जाहीर केले. यावेळी राष्ट्रवादीच्या भूमिकेचा निषेध नोंदवण्यात आला.

नगराध्यक्ष निशिकांत पाटील, मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. विकास आघाडीचे ११ सदस्य उपस्थित होते. शासनाच्या नगरविकास विभागाने नगरपरिषद कार्यक्षेत्रासाठी विशेष रस्ता अनुदान म्हणून अकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शिवसेनेचे नेते, नगरसेवक आनंदराव पवार यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला होता; परंतु या सभेला राष्ट्रवादीच्या सर्वच नगरसेवकांनी तसेच अपक्ष आघाडीचे उपनगराध्यक्ष दादासो पाटील यांनी या सभेकडे पाठ फिरवली.

हेही वाचा: T20 WC : पाकिस्तानचा खेळ खल्लास! नवा गडी नवं राज्य!

ही सभा रद्द करावी लागल्यावरून आनंदराव पवार यांनी राष्ट्रवादीवर हल्ला चढवत जोरदार निषेध नोंदवला. ‘मला आत्ताच राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाचा फोन आला होता आणि त्याच्याकडून असे समजले की त्यांच्या मोठ्या नेत्याने या सभेला कुणी जाऊ नये, असा आदेश दिल्यामुळे नगरसेवक गैरहजर राहिले आहेत, असे म्हणत त्यांनी शहराचा विकास त्यांना बघवत नाही, हे आज स्पष्ट झाले आहे. यातील काही निधी राष्ट्रवादीच्या प्रभागातही खर्च होणार होता; मात्र तरीही राष्ट्रवादीने घेतलेल्या या भूमिकेचा मी जाहीर निषेध करतो’, असे त्यांनी सांगितले. शिवसेनेचे नगरसेवक शकील सय्यद, विकास आघाडीचे विक्रम पाटील यांनी राष्ट्रवादीवर टीका केली.

पुढील सभा उद्या

आज रद्द करण्यात आलेली विशेष सभा आता शनिवारी (ता. १३) साडेअकरा वाजता होणार असल्याचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी जाहीर केले.

३१ मार्च २२ पूर्वी हा निधी खर्च होणे आवश्यक असल्याचे सांगत हा निधी कोणत्याही परिस्थितीत खर्च व्हायला हवा, अन्यथा पालिकेचे आर्थिक नुकसान होईल. कोणत्याही नगरसेवकाला असे नुकसान करण्याचा अधिकार नाही. कायद्यानुसार त्याला शिक्षा होऊ शकते. याची नोंद घेतली जाईल. अतिनिकडीची सभा म्हणून याकडे पाहणे अपेक्षित असताना राष्ट्रवादीने असे का केले समजत नाही.

- निशिकांत पाटील, नगराध्यक्ष

loading image
go to top