
Sangali : जत तालुक्यात शाळकरी मुलीची छेडछाड
जत : तालुक्यातील एका अल्पवयीन शाळकरी मुलीला गाठत तिघा तरुणांनी छेडछाड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत मुलगी बेशुद्ध पडल्याने तिला तेथेच टाकून तिघे पसार झाले.
आज दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास ही घटना घडली. ही घटना घडताच परिसरातील नागरिक जमा झाले. दरम्यान, पीडित मुलीच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. त्यांनी तत्काळ जत पोलिस ठाणे गाठत या घटनेची माहिती दिली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून त्या तिघा संशयितांचा शोध सुरू होता. महिनाभरात त्याच रस्त्यावर दुसरी घटना घडल्याने शहरात खळबळ माजली आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पीडित अल्पवयीन मुलगी शहरातील एका महाविद्यालयात अकरावीत शिकत आहे. सध्या दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे शाळा दुपारीच सुटते. पीडित मुलगी शाळा सुटल्यानंतर दुपारी घरी निघाली होती.
येथील वन विभागाच्या कार्यालयाजवळ असताना दुचाकीवरून तिघे संशयित तरुण आले आणि त्यांनी पीडित मुलीची छेडछाड करण्यास सुरवात केली. मुलीने आरडाओरडा केला. तेव्हा तिला भोवळ आली. त्या छेडछाड करणाऱ्या तिघांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तेथून पळ काढला.
त्याच दरम्यान शाळेतील एका मुलाने ही घटना पाहताच त्याने नागरिकांना ही घटना सांगितली. नागरिकांनी मुलीला शुद्धीवर आणल्यानंतर तिला घरी सोडले. पीडितेच्या कुटुंबीयांनी लगेचच जत पोलिस ठाणे गाठत पोलिसांना घडलेली घटना सांगितली.
पोलिस तेथील सीसीटीव्ही चित्रिकरण तपासून संशयितांचा शोध घेत आहेत. मात्र, रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद पोलिसात झालेली नव्हती.
त्याच रस्त्यावर दुसरी घटना...
गेल्या महिन्यात त्याच रस्त्यावर पोलिस भरतीची तयारी करण्यासाठी जाणाऱ्या मुलीला काही तरुणांनी छेडछाड करत तिला व तिच्या भावाला मारहाण केल्याची घटना घडली होती. आज पुन्हा त्याच रस्त्यावर महाविद्यालयातून येणाऱ्या मुलीला गाठत तिघांनी छेडछाड केली. या घटनेने पुन्हा महिला, शाळकरी मुलींची सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.