esakal | Sangali: पाटील यांनी बेकायदेशीर प्रक्रिया राबवून गाळे घेतले- डांगे
sakal

बोलून बातमी शोधा

पाटील यांनी बेकायदेशीर प्रक्रिया राबवून गाळे घेतले- डांगे

सांगली : पाटील यांनी बेकायदेशीर प्रक्रिया राबवून गाळे घेतले- डांगे

sakal_logo
By
धर्मवीर पाटील,

इस्लामपूर (सांगली) : पदाचा गैरवापर करून नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी नाट्यगृहाच्या इमारतीत दुसऱ्याच्या नावावर गाळे घेतले हे न्यायालयाच्या आदेशाने सिद्ध झाले आहे. उच्च न्यायालयाने आमच्या आरोपांना पुष्टी दिली असून यापुढे तरी त्यांनी कायदेशीर मार्गाने कामकाज करून शहरातील महत्त्वाच्या गरजांकडे लक्ष द्यावे, असे आव्हान सभापती विश्वनाथ डांगे व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, नगरसेवक शहाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले, "अपक्ष आघाडीचे नगरसेवक व उपनगराध्यक्ष दादासो पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या १३ जणांनी मिळून न्यायालयात याचिका दाखल केली होती. नाट्यगृहाच्या इमारतीत भाजपचे कार्यालय बेकायदेशीररित्या सुरू करण्यात आले होते. संबंधित कार्यकर्ते व नातेवाईक यांच्या नावे लिलाव प्रक्रिया केल्याचे बनावट दाखवून संगनमताने गाळे घेतले होते. एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी मालमत्तेचा अशा पद्धतीने वापर करणे बेकायदेशीर असल्याने आम्ही दाद मागितली होती त्याला न्याय मिळाला आहे. आम्ही यावर सभागृहात विषय मांडून चर्चा करण्याचा केलेला प्रयत्न त्यांनी वारंवार हणून पाडला. आम्हाला बोलू दिले नाही.

हेही वाचा: मुंबई : कोरोनामुळे डोळ्यांच्या रेटिनाला धोका, डोळ्यांच्या समस्या वाढल्या

त्यामुळे न्यायालयात दाद मागावी लागली. नगराध्यक्षांनी स्वतःच्या स्वार्थासाठी अनोळखी लोकांना पुढे करून गाळे घेतले. कोविड काळात तीन वर्षे मुदत संपत आली होती. दरम्यान निकाल उलट जाणार याचा अंदाज आल्याने त्यांनी ते गाळे पालिकेला परत दिले आहेत. न्यायालयाने मंगळवारी (ता. ५) हे आदेश दिले आहेत आणि जिल्हाधिकारी यांना कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आमची याचिका व त्यात मांडलेले मुद्दे हीच तक्रार समजून त्यावर निकाल देण्याच्या सूचना केल्या आहेत. आमचा न्यायदेवता आणि जिल्हाधिकारी यांच्यावर विश्वास असून कारवाई होईल याची खात्री आहे."

ते म्हणाले, "शहरात अनेक समस्या आहेत. डेंग्यू व अन्य साथीचे आजार पसरले आहेत. रस्त्यांची दुरवस्था आहे. शिवाय अनेक मूलभूत प्रश्नांनी नागरिक बेजार आहेत. नगराध्यक्षांनी यापुढील काळात तरी या विषयांवर काम करावे आणि नागरिकांना दिलासा द्यावा. बेकायदेशीर कृत्य सुरूच ठेवल्यास राष्ट्रवादी आणि अपक्ष आघाडी मिळून त्यांना कायदेशीर मार्गाने आपला विरोध सुरूच ठेवेल आणि चोख प्रत्युत्तर देईल."

loading image
go to top