‘कर्मयोगी’ पुरस्काराने ‘रयत’ संस्थेला स्फूर्ती - डॉ. अनिल पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

सांगली - ‘शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या ‘रयत’ शिक्षण संस्थेला शांतिनिकेतनच्या ‘कर्मयोगी’ पुरस्कारामुळे स्फूर्ती मिळणार आहे. हा पुरस्कार केवळ रयत संस्थेचा नव्हे, तर हजारो विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्यासह तुमचासुद्धा आहे,’ असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी येथे केले.

सांगली - ‘शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या ‘रयत’ शिक्षण संस्थेला शांतिनिकेतनच्या ‘कर्मयोगी’ पुरस्कारामुळे स्फूर्ती मिळणार आहे. हा पुरस्कार केवळ रयत संस्थेचा नव्हे, तर हजारो विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्यासह तुमचासुद्धा आहे,’ असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी येथे केले.

शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचा ‘कर्मयोगी’ पुरस्कार रयत शिक्षण संस्थेला तर ‘माई’ पुरस्कार शामराव जगताप, टी. डी. पाटील यांना प्रदान केला. त्या वेळी डॉ. पाटील बोलत होते. आमदार सुमन पाटील, निवृत्त आयपीएस अधिकारी भगवंतराव मोरे, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, नवभारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विशाल पाटील, हुतात्मा संकुलाचे वैभव नायकवडी, सनतकुमार आरवाडे, गौतम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

सत्कारमूर्ती डॉ. पाटील म्हणाले, ‘‘रयत शिक्षण संस्थेच्या वटवृक्षाला ९८ वर्षे झाली आहेत. शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या संस्थेला प्राचार्य पी. बी. पाटील यांनी सुरू केलेल्या ‘कर्मयोगी’ पुरस्कार दिल्यामुळे स्फूर्ती मिळणार आहे. रयत आणि शांतिनिकेतनच्या कमवा-शिका योजनेतून अनेक विद्यार्थी घडले. पी. बी. पाटील आणि रयत संस्थेचे अतूट नाते आहे. संस्थेला ९८ वर्षे झाली म्हणून हा पुरस्कार मिळाला नाही, तर ग्रामीण भागातील रयतेसाठी केलेल्या कामाचा हा गौरव आहे. एका विद्यार्थ्याला घेऊन कर्मवीर अण्णांनी सुरवात केली. आज हजारो विद्यार्थी येथे शिकतात. केवळ आकडेवारी ही ओळख नाही, तर समाजाशी संस्थेची नाळ जोडली गेली आहे. ९८ वर्षांत एकदाही संस्थेत निवडणूक लागली नाही. आज शिक्षणाचा बाजार मांडला गेला आहे. इंजिनिअर, पीएच.डी.धारक निरुपयोगी ठरत आहेत. ही परिस्थिती बदलायची असेल, 
तर केजीपासून पीएचडीपर्यंत वेगळी शिक्षण पद्धती आणावी लागेल. रयतेने ही वेगळी शिक्षण पद्धती उभी केली आहे. अशा परिस्थितीत हा पुरस्कार म्हणजे मिळालेली साथ आहे.’’

अध्यक्षीय मनोगतात डॉ. पवार म्हणाले, ‘‘कर्मवीर अण्णांना राजर्षी शाहू महाराज यांनी प्रेरणा दिली होती. त्याच प्रेरणेतून प्राचार्य पी. बी. पाटील यांनी लोकविद्यापीठ उभारले. त्यामुळे आज रयत संस्थेला दिला जाणार कर्मयोगी पुरस्कार म्हणजे बहुजन समाजाचा गौरव आहे. झिरो बजेटपासून रयत संस्थेची सुरवात झाली. आज ११०० कोटी रुपयांचे बजेट आहे. हा शाहू महाराजांचा आशीर्वादच म्हणावा लागेल. आजचा पुरस्कार कर्मवीर अण्णांबरोबर शाहू महाराजांचादेखील आहे.’’

श्री. मोरे म्हणाले, ‘‘नवभारत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विचारांचे स्फुल्लिंग पेटवण्याचे काम पी. बी. सरांनी केले. कर्मवीर अण्णा, पी. बी. सरांनी संस्काराला महत्त्व दिले.

त्यामुळे दोन्ही संस्थांतून हजारो विद्यार्थी घडले. लवकरच शंभर वर्षे पूर्ण करणाऱ्या रयत संस्थेला कर्मयोगी पुरस्कार, तर संस्थेत निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या दोघांना ‘माई’ पुरस्कार देऊन गौरवले गेले. त्यामुळे या पुरस्काराला फार मोठे महत्त्व आहे.’’
गौतम पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. श्री. मोरे व सौ. अनुराधा मोरे, डॉ. पवार, श्री. कांबळे, विशाल पाटील, रंगावलीकार संतोष ढेरे यांचा सत्कार केला. शांतिनिकेतनचे माजी विद्यार्थी, रयत संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. माजी विद्यार्थी शौकत मुलाणी यांनी आभार मानले.

पुरस्कार नव्हे मानाचा मुजरा-

उत्तम कांबळे म्हणाले, ‘‘रयत शिक्षण संस्थेने शिक्षणाचा संबंध संस्काराशी जोडला. घामाच्या थेंबातून येथे शिक्षण व संस्कार फुलवताना जे पीक आले, त्याला विचाराचा पाया दिला. शंभर वर्षे पूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या संस्थेला मानाचा मुजरा म्हणजे आजचा पुरस्कार वितरण कार्यक्रम म्हणावा लागेल. केवळ वय वाढलेली संस्था नव्हे, तर परिवर्तन घडवणारी संस्था आहे. शांतिनिकेतन लोकविद्यापीठातर्फे रयतला दिलेला पुरस्कार म्हणजे आईला मुलाने दिलेला पुरस्कार म्हणावा लागेल. पी. बी. सर हे कर्मवीरांचे ‘क्‍लोन’ होते.’’

Web Title: Sangali News Dr Anil Patil comment