... इथे वाहते गटारगंगा 

आनंद गायकवाड 
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

शहरात प्रवेश करतानाच अरगडे गल्लीत गेल्या तीन दिवसांपासून सकाळी रस्त्यावरून वाहणाऱ्या गटाराच्या पाण्यामुळे मारुती मंदिरात पहाटेपासून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

संगमनेर : शहरातील नागरी वस्तीतील सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटाराची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे शहरातील काही प्रभागांत गटारे तुंबण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरात प्रवेश करतानाच अरगडे गल्लीत गेल्या तीन दिवसांपासून सकाळी रस्त्यावरून वाहणाऱ्या गटाराच्या पाण्यामुळे मारुती मंदिरात पहाटेपासून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

शहराच्या सांडपाण्याच्या विसर्जनासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून गटाराची व्यवस्था केली आहे. शहरातील मोमीनपुरा ते बसस्थानक परिसरातील दत्त मंदिर या दरम्यान ब्रिटीशकाळातील गटारात इंग्रजी "यू' आकारातील पाइप टाकून त्यावर बांधकाम केले होते. कालांतराने शहरातील जुने वाडे, घरे पाडली जाऊन, तेथे नव्याने इमारती व निवासी संकुले उभी राहिली. शहराची लोकसंख्या वाढल्याने पाण्याचा वापरही वाढला व पर्यायाने सांडपाणी वाढले. 

सांडपाणी रस्त्यावर 
शहरातील काही प्रभागांत गटारे तुंबण्याचे प्रकार वाढल्याने, पालिकेने विविध ठिकाणी गटारांची दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. अरगडे गल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील मारुती मंदिरात पहाटेपासून भाविकांची गर्दी असते. या परिसरातील गटाराच्या चेंबरमधून सकाळी मोठ्या प्रमाणात सांडपाणी वाहते. ते रस्त्यावर पसरते. खड्ड्यांत साचते. 

बंदिस्त गटार करण्याची मागणी 
या रस्त्यावरील संग्राम पतसंस्था, कापड दुकाने, सेतू केंद्रात येणाऱ्यांना या सांडपाण्यातून वाट काढताना कसरत करावी लागते. सध्या संगमनेरात सकाळी पूर्ण दाबाने पाणी येते. त्यामुळे सांडपाण्याचे प्रमाण वाढले आहे. जुन्या गटारांऐवजी आगामी काळाची गरज लक्षात घेता, दोन ते तीन फूट व्यासाचे नवीन पाइप टाकून बंदिस्त गटारे करण्याची मागणी होत आहे. 

आजाराला निमंत्रण 
अरगडे गल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील मारुती मंदिरात पहाटेपासून भाविकांची गर्दी असते. चेंबर तुंबल्याने रस्त्यावरून गटर वाहत असल्याने सर्वत्र दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे आजार बळावण्याची शक्‍यता आहे. 

दुरूस्तीचा प्रस्ताव दिला 
शहरातील कालबाह्य झालेल्या गटारांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या गटारांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पालिकेकडे दिला आहे. लवकरच हे काम सुरू होणार आहे. 
- अरविंद गुजर, आरोग्य निरीक्षक, नगरपालिका  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangamnerat flowing gtrarganga