Prithviraj Pawar : सांगली : विमानतळ जागेच्या काळाबाजाराचे षड्‌यंत्र

कवलापूर विमानतळाच्या १६० एकर जागेचे तुकडे पाडून त्यातून कोट्यवधी रुपयांचा नफा मिळवण्याचा काळाबाजार मांडला गेला आहे.
Sangli Airport
Sangli Airportsakal
Summary

कवलापूर विमानतळाच्या १६० एकर जागेचे तुकडे पाडून त्यातून कोट्यवधी रुपयांचा नफा मिळवण्याचा काळाबाजार मांडला गेला आहे.

सांगली - कवलापूर विमानतळाच्या १६० एकर जागेचे तुकडे पाडून त्यातून कोट्यवधी रुपयांचा नफा मिळवण्याचा काळाबाजार मांडला गेला आहे. ‘स्पाईस बोर्ड’ हे जागा हडप करण्यासाठी रचलेले निव्वळ ढोंग आहे. या जागेवर विमानतळच होईल. ज्यांना औद्योगिक वसाहत करायची आहे, त्यांनी पर्यायी जागेचा शोध घ्यावा. जनमताचा अनादर कराल तर रस्त्यावरच्या लढाईला तयार राहा, असा इशारा विमानतळ बचाव कृती समितीचे निमंत्रक व भाजप नेते पृथ्वीराज पवार, माजी आमदार नितीन शिंदे आणि सतीश साखळकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

कवलापूर विमानतळासाठी बैठका घेणे, निवेदन देणे, निदर्शने, ठिय्या आंदोलन, मोर्चा, सांगली बंद या मार्गांनी आंदोलनाची दाहकता वाढवत नेऊ, असा इशारा त्यांनी दिला. पृथ्वीराज पवार म्हणाले, ‘‘मोक्याची जागा कमी किमतीत खरेदी करायची आणि प्रचंड किमतीला विकून त्यात नफा कमवायचा, असा काळाबाजार उघड आहे. कवलापूरच्या जागेवर ‘उद्योग विकासाची दिशा’ दाखवून ही जागा घशात घालण्याचे षड्‌यंत्र रचले गेले आहे. ‘सांगली स्पाईस बोर्ड’ ही एनजीओ असल्याचे थोतांड सांगितले जात आहे. एनजीओचा उद्देश सामाजिक हिताचा असतो. या ‘बाजारा’त समाजहित कुठे आहे? नफेखोरी आणि धनदांडग्यांची घरे भरण्याचा कार्यक्रम आहे.

सांगली बाजार समितीने सावळी येथील जागा विकली. ती ज्यांनी घेतली, तीच मंडळी या ‘बाजारा’तील म्होरके आहेत. आम्ही या प्रक्रियेविरोधात रस्त्यावर उतरू. विमानतळासाठी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेणार आहोत. येथे फक्त ९०० मीटर लांबीच्या धावपट्टीसाठी जमीन खरेदी करणे गरजेचे आहे. जागा कमी पडते, असे सांगणाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग सरकारी जागेवर बांधले आहेत का? त्यासाठी हजारो एकर जागा खरेदी होऊ शकते, मग विमानतळासाठी जागा खरेदी करता येत नाही का?’’

नितीन शिंदे म्हणाले, ‘‘कवलापूरच्या जागेवर विमानतळच झाले पाहिजे. जनमत त्या बाजूने आहे. त्यासाठी लोक रस्त्यावर उतरतील. हे आंदोलन टप्प्याटप्प्याने वाढवत नेऊ.’’

सतीश साखळकर म्हणाले, ‘‘कोल्हापुरात हाडवैर असलेले नेते विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येतात, मात्र सांगलीत जागा हडप करताना एकमत होते, हेच दुर्दैव आहे. कवलापूर विमानतळावर १९५५ पासून विमाने उतरत होती, असा इतिहास आहे. दुष्काळात सुकडी पोहोचवणे, टोळधाडीवेळी विमानाने औषध फवारणी अशी कामे झाली आहेत. आजही धावपट्टीचे आरक्षण कायम आहे. ही लढाई सांगली जिल्ह्यातील प्रत्येकाची आहे. ती निकराने लढूया, तरच पुढच्या पिढ्यांसाठी काहीतरी शिल्लक ठेवता येईल.’’

‘मणेराजुरीची काळजी, कवलापूर कुणाचे आहे?’

खासदार संजय पाटील यांच्या भूमिकेला धक्का देताना पृथ्वीराज पवार म्हणाले, ‘‘खासदार संजय पाटील यांनी मणेराजुरीत औद्योगिक वसाहतीला विरोध केला होता. तेथे द्राक्षबागा वाढल्याचे ते सांगत आहेत. कवलापुरात द्राक्षबागा नाहीत का? तिथे चिंचोके पिकतात काय? कुपवाड औद्योगिक वसाहतीमुळे तेथील पाणी, हवा प्रचंड प्रदूषित झाली आहे. प्रदूषित शहरांत राज्यात आपण चौथ्या क्रमांकावर आहोत. मग सांगली शहरालगत आणि कवलापूर गावात औद्योगिक वसाहत करून तुम्हाला इथल्या जनतेच्या आरोग्याशी खेळ करायचा आहे का? जे स्पाईस बोर्डचे नाव सांगतात, त्यांनी आधी सांगलीत हळद टिकणार आहे का, याचे उत्तर द्यावे. त्यापैकी काहींनी वसमतला जागा खरेदी करून हळद प्रक्रिया उद्योग सुरू केले. इथे केवळ दिशाभूल केली जात आहे. स्पाईस इंडस्ट्रीला सांगलीत फारशा संधी नाहीत, असे तज्ज्ञच सांगत आहेत.’’

‘सुरेश पाटील, मालू मालक आहेत का?’

पृथ्वीराज पवार म्हणाले, ‘‘स्पाईस बोर्डने या जागेचा काळाबाजार करण्याचा डाव आखून साडेतीनशे लोकांची नोंदणी करून घेतल्याचे समजते. जिल्ह्यात कुणी उद्योजक व्हायचे, कुणी व्यापारी व्हायचे, हे सुरेश पाटील आणि सतीश मालू ठरवणार आहेत का? उद्योगाचा विकास करायचा होता तर एखादा सामान्य शेतकरी, हमाल, माथाडी, सामान्य उच्चशिक्षित तरुणाला तुम्ही गुंठाभर जागा द्यायला तुमच्या एनजीओत घेतले आहे का? सामान्यांच्या पोरांनी वेठबिगारी, हमाली आणि तुमच्या दारात रखवालदारी करावी, अशी तुमची इच्छा आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com