esakal | सांगली : इस्लामपूरमधील गाळ्यांची लिलावप्रक्रिया अखेर रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

सांगली : इस्लामपूरमधील गाळ्यांची लिलावप्रक्रिया अखेर रद्द

sakal_logo
By
धर्मवीर पाटील,

इस्लामपूर (जि. सांगली) : तांत्रिक व प्रशासकीय कारणास्तव गाळ्यांची लिलावप्रक्रिया रद्द करण्यात येत असल्याची घोषणा इस्लामपूर पालिका प्रशासनाच्या वतीने रात्री करण्यात आली. शहरातील आंबेडकर पुतळा परिसरातील क्रांतिसिंह नाना पाटील, राजारामबापू पाटील शॉपिंग सेंटर, अंबिका उद्यान, शिवाजी चौक, संभुआप्पा, बाजारमाळ येथील गाळ्यांची लिलावप्रक्रिया नव्याने पार पाडण्याचे नियोजन नगरपालिकेने केले होते.

विविध दैनिकातून ही प्रक्रिया अधिकृतपणे जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर व्यापाऱ्यांनी त्याला विरोध दर्शविला होता. पालकमंत्री जयंत पाटील, नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना भेटून अडचणी मांडल्या होत्या. दोन्ही बाजुंनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या मध्ये राजकारण सुरू असल्याचा आरोप सुरू होता. गाळेधारक राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक असल्याने ही लिलावप्रक्रिया घेण्यात येत असल्याची चर्चा होती.

नगराध्यक्ष पाटील यांनी नाट्यगृहात बैठक घेऊन व्यापाऱ्यांना लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हा, योग्य पद्धतीने न्याय देऊ असा दिलासाही दिला होता. याच बैठकीत राष्ट्रवादी कडून होत असलेल्या आरोपालाही त्यांनी सडेतोड उत्तर दिले होते. आणि लिलावाचा निर्णय किंवा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात कसा झाला होता, हे सर्वांच्यासमोर मांडले होते. मात्र आज रात्री नगरपालिकेकडून प्रशासकीय व तांत्रिक कारणास्तव ही प्रक्रिया रद्द करण्यात येत असल्याचे पालिकेने जाहीर केले. त्यामुळे हा लिलाव होऊ नये, असे वाटणाऱ्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

loading image
go to top