Sangli : भाजपकडून राष्‍ट्रवादीचाच ‘कार्यक्रम’

सभापतिपदी धीरज सूर्यवंशी काँग्रेसचे संतोष पाटील यांचा पराभव राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांची गैरहजेरी
sangli
sanglisakal

सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी यांची नऊ विरुध्द पाच मतांनी निवड झाली. राष्ट्रवादीच्या सदस्या पवित्रा केरीपाळे व संगीता हारगे या दोन सदस्यांच्या गैरहजेरीमुळे त्यांचा विजय विनासायास सहज सुकर झाला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे संतोष पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपमध्ये बंडाळीची हवा करणाऱ्या राष्ट्रवादीचेच दोन सदस्य गैरहजर ठेवत भाजपने त्यांचा ‘कार्यक्रम’ केला.

आज सकाळी पालिकेच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी होते. काल सूर्यवंशी, तर आघाडीकडून फिरोज पठाण व संतोष पाटील यांनी अर्ज दाखल केले होते. आघाडीच्या पठाण यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे सूर्यवंशी व पाटील यांच्यात लढत झाली. ‘स्थायी’त भाजपचे ९, काँग्रेसचे ४, तर राष्ट्रवादीचे ३ असे बलाबल होते. राष्ट्रवादीचे दोन सदस्य गैरहजर राहिल्याने निकाल आधीच स्पष्ट झाला. राष्ट्रवादीच्या सदस्य डॉ. नर्गिस सय्यद सभागृहात उपस्थित होत्या. त्यांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले. काँग्रेसच्या सर्व ४ सदस्यांसह पाटील यांना पाच मते मिळाली.

विजयानंतर पालिकेच्या आवारात सूर्यवंशी समर्थकांनी गुलालाची उधळण व फटक्यांची आतषबाजी केली. वाद्यांच्या निनादामध्ये मिरवणूक निघाली. आमदार सुधीर गाडगीळ, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, शहर-जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे सभागृह नेते विनायक सिंहासने, सुरेश आवटी यांनी सूर्यवंशी यांचा सत्कार केला.हा विजय भाजपच्या एकजुटीचा आहे.

राष्‍ट्रवादीने महापौर निवडणुकीवेळी जे पेरले तेच आता उगवले आहे. पाच वर्षांत झाले, इतके काम मी वर्षात करून दाखवेन.

- धीरज सूर्यवंशी, नूतन सभापती

महापालिकेत भाजप एकसंघ आहे, हे पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे. येत्या वर्षात प्रलंबित कामे मार्गी लावून आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ. श्री सूर्यवंशी यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. ते ती पार पाडतील, याची खात्री आहे.

- विनायक सिंहासने, गटनेते, भाजप

विरोधकांनी भाजपमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र आमचे सर्व सदस्य एकसंघ राहिले. विकासाला आम्ही गती देऊ. राज्य सरकारकडून कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे व आमदार सुधीर गाडगीळ यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणू. कुपवाड ड्रेनेज, घनकचरा, शेरीनाला प्रकल्प, शामरावनगरचा पाणी निचरा, असे प्रश्न वर्षात मार्गी लावू

- शेखर इनामदार, भाजपचे महापालिकेतील नेते

राष्ट्रवादीने विश्‍वासघात केला. भाजपचे दोन सदस्य आमच्या संपर्कात होते. मात्र, राष्ट्रवादीने धोका दिल्याने पराभव झाला. नेत्यांचा त्यांच्या सदस्यांवर वचक राहिलेला नाही. महापौरांसह महत्त्वाचे पदाधिकारी निवडणुकीपासून दूर राहिले. ते सत्तेशिवाय राहू शकत नाही, हेच दिसून आले. आम्हा एकसंघपणे विरोधकाची भूमिका बजावू.

- संजय मेंढे, गटनेते, काँग्रेस

आमच्या तिन्ही सदस्यांनी पाठिंब्याची ग्वाही दिली होती. तसा आम्ही काँग्रेसला शब्द दिला. मात्र, केरीपाळे व हारगे यांनी गैरहजरी दाखवली. केरीपाळे दोन दिवसांपासून संपर्कातच नव्हत्या. त्यांच्या दोन्ही मुलांनीही फोन उचलला नाही. हारगे ‘येते, येते’ म्हणत आल्या नाहीत. याचा अहवाल नेते जयंत पाटील यांना देणार आहे. त्यांची पक्षातील काहींवर नाराजी आहे. ती देखील मी अहवालात मांडणार आहे.

- मैन्नुद्दीन बागवान, गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com