सांगली : संततधार तरीही उपनगरांमध्ये घशाला कोरड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water

सांगली : संततधार तरीही उपनगरांमध्ये घशाला कोरड

सांगली : गेली तीन-चार महिने सांगलीतील उपनगरांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. कुपवाडमधील उपनगरे, विश्रामबाग, शामरावनगरातील काही भागांत सातत्याने पाणी पुरवठा कमी होत आहे. नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी खासगीत टँकर घ्यावे लागत आहेत. गावठाण भागात पाणी पुरवठा कमी झाला की यंत्रणा लगेच जागी होते, धावाधाव होते. मात्र उपनगरांबाबत मात्र ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी स्थिती आहे.

इथे टंचाई...

विश्रामबागमधील काही भागात सुरळीत पाणी पुरवठा असताना गव्हर्न्मेंट कॉलनी, स्‍फूर्ती चौक, सहयोगनगर भागात मात्र पाण्याची टंचाई आहे. शामरावनगरातील मदरसा परिसर, आदित्य कॉलनी, एपीजे अब्दुल कलाम चौक परिसर, ज्ञानेश्‍वर कॉलनी, महादेव कॉलनी, सद्‌गुरू कॉलनी, विश्‍वविनायक कॉलनी, श्रीराम कॉलनी या भागात पाणी टंचाई आहे. प्रभाग पंधरासह अन्य भागांत गेल्या आठवडाभरापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. नगरसेवकांना प्रभागात स्वखर्चातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. रमामातानगर, पटेल गल्लीत वेगवेगळ्या कारणांमुळे पाणी टंचाई आहे.

नदी प्रदूषणाचा प्रश्‍न भयावह

पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन हा प्रश्‍न असताना चर्चा मात्र वारणा उद्‍भव योजनेवर होत असते. सध्याच्या योजनांवर कोट्यवधींचा खर्च झाला आहे. मुळात वेळच्या वेळी देखभाल आणि त्यासाठी निधीची तरतूद केली तर शुद्ध पाणी मिळू शकते. नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्‍न भयावह आहे. अगदी नुकतेच मळीमिश्रित पाणी कारखान्यांनी सोडल्याने भिलवडीपासून अंकलीपर्यंत नदीपात्र प्रदूषित झाले आहे. मासे मृत होऊन खच पडला आहे. याकडे मात्र कोणाचे लक्ष नसते.

ऑडिटची गरज

महापालिका क्षेत्रात २७ पाण्याच्या टाक्या नव्याने बांधल्या आहेत. त्यांची क्षमता १५ ते २० लाख लिटर आहे. चार लाख लोकसंख्येला दररोज ७ कोटी लिटर पाणी दिले जाते. यातील किती पाणी नागरिकांपर्यंत पोहोचते आणि गळती किती होते, याचा हिशेब लावण्याची गरज आहे. १ लाख ४५ हजार मालमत्ताधारकांची संख्या असताना केवळ सुमारे ७० हजार पाणी ग्राहक आहेत. माळबंगला येथील ७० एमएलडी, शुद्धीकरण केंद्रातून ५६ एमएलडी पाणी नागरिकांना पुरवले जाते.

नदीतून जितके पाणी उचलले जाते, त्याच्या केवळ ५० टक्केच पाणी पोहोचते, बाकी ५० टक्के पाण्याची गळती होते. या साऱ्यांचे ऑडिट करून पुढे जायला हवे. आता घरपट्टी, पाणीपट्टी बिलाचे एकत्रिकरण करण्यात येणार आहे. बनावट जोडण्या

एकीकडे, नागरिकांच्या तक्रारी असताना पाणी पुरवठा विभागासमोर मात्र अनंत प्रश्‍न आहेत. जुन्या वाहिन्या असल्याने अनेक ठिकाणी गळती आहे. पाणी पुरवठा विभागाचा सारा भार मानधनावरील कर्मचाऱ्यांवर आहे. त्या-त्या भागात हे कर्मचारी तळ ठोकून आहेत. त्यांच्याकडूनच बनावट जोडण्या दिल्याच्या तक्रारी आहेत. मात्र त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यास प्रशासनही धजावत नाही. एखाद्या कर्मचाऱ्याची बदली केलीच, तर ती रद्द करण्यासाठी पदाधिकारीच पुढे येतात. स्थायी समिती आणि महासभेत यावर केवळ चर्चा होते.

विश्रामबाग परिसरातील काही भागाला कुपवाडमधून औद्योगिक वसाहतीकडून पाणी पुरवठा होतो. मध्यंतरी काही काळ टंचाई होती, मात्र आता पुरवठा सुरळीत आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी महापालिकेकडे द्याव्यात. त्यांची तत्काळ दखल घेतली जाईल.

- सुनील पाटील, कार्यकारी अभियंता

या पावसाळ्यात सुखद धक्का इतकाच की यावर्षी अद्याप गढूळ पाणी पुरवठा झालेला नाही. एरव्ही पावसाळा सुरू होताच लाल गढूळ पाणीच प्यावे लागते. यावर्षी हा अनुभव न आल्याबद्दल धन्यवाद!

- विजय पडियार, पत्रकारनगर

Web Title: Sangli Continuity Still Dry Throat Suburbs

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top