esakal | सांगली: कोयना धरणातून २५ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग
sakal

बोलून बातमी शोधा

koyna dam

सांगली: कोयना धरणातून २५ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली: कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे कोयना धरणसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. कोयना धरणातील पाणी साठा १०३ टीएमसी इतका झाला आहे. धरणाच्या क्षमतेच्या ९९ टक्के साठा झाला आहे. त्यामुळे पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सायंकाळपासून २५ हजार क्युसेस इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

हेही वाचा: सांगली: दुबईतील कंपनीचा व्यापाऱ्याला १ कोटी ३६ लाख रुपयांचा गंडा

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असल्याने पाणी साठा वाढत आहे. त्यातच हवामान विभागाने पुढचे पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पाणी साठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

पाटबंधारे विभागाने आज दुपारी दोन वाजल्यापासून १० हजार २६४ क्युसेस विसर्ग चालू केला. त्यामुध्ये वाढ करुन सायंकाळी पाच वाजल्यापासून २५ हजार क्युसेक्स इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

धरण क्षेत्रात असाच पाऊस सुरु राहील्यास धरणामधील आवक वाढल्यास विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. नदी काठच्या विशेषत: वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील तसेच महापालिका क्षेत्रातील नदी काठावरील व सखल भागातील नागरिकांनी सावधानता बाळगावी. नदी पात्रात कोणीही जाऊ नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकची सतर्क बाळगण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी केले आहे.

सद्यस्थितीतीत धरणातील पाणीसाठा (टीएमसी) व विसर्गाची माहिती (क्यूसेक्स) पुढीलप्रमाणे- कोयना धरण १०३.८४, विसर्ग २५०००; धोम धरण १२.१४, विसर्ग ६२२; कन्हेर धरण ९.४९ विसर्ग २४; उरमोडी धरण ८.६२ विसर्ग ३५०; तारळी धरण ५.५९, विसर्ग २७०.

कृष्णेची पातळी २० फुटांवर जाण्याचा अंदाज

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग २५ हजार क्यूसेक्स इतका सुरु आहे. त्यामुळे सांगलीत आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी २० फुटांवर जाण्याचा अंदाज आहे. पाणी पातळी वाढण्याचा अंदाज घेऊन नागरिकांना सतर्क करण्यात येणार आहे. विसर्ग वाढवण्यात आला तर पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

loading image
go to top