निवडणुकांसाठी शिवसेना 4 जागांवर अडून; लवकरच होणार अंतिम निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP-BJP-Shivsena

वरिष्ठ नेते मंडळींच्या चर्चेनंतर अर्ज माघारीपूर्वी दोन दिवस अगोदर अंतिम निर्णय होणार आहे.

निवडणुकांसाठी शिवसेना 4 जागांवर अडून; लवकरच होणार अंतिम निर्णय

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याचे सोमवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत निश्‍चित केले. राष्ट्रवादीला ११, काँग्रेसला ८ आणि शिवसेनेला दोन जागा देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली; परंतु शिवसेना चार जागांवर अडून बसली आहे. त्यामुळे वरिष्ठ नेते मंडळींच्या चर्चेनंतर अर्ज माघारीपूर्वी दोन दिवस अगोदर अंतिम निर्णय होणार आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गेले काही दिवस राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना नेते, तसेच जिल्हाध्यक्षांमध्ये जागा वाटपांवरून चर्चा सुरू आहे. सोमवारी देखील रात्री उशिरा काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची बैठक सांगलीत झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील, कृषी व सहकार राज्यमंत्री विश्‍वजित कदम, आमदार अनिल बाबर, आमदार विक्रम सावंत, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, अविनाश पाटील, अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, देवराज पाटील, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा: अधिकारी बापाला पोलिस ऑफिसर मुलीचा कडक सॅल्युट

बैठकीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राज्याप्रमाणे भाजपला दूर ठेवून महाविकास आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री श्री. पाटील यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला मांडला. राष्ट्रवादीला ११, काँग्रेसला आठ आणि शिवसेनेला दोन जागा देण्याचा प्रस्ताव मांडला. स्वीकृतची एक जागा राष्ट्रवादीकडे राहील. स्वीकृतमध्ये ज्या पक्षाला जागा हवी आहे, त्यांना त्यांच्यातील एक जागा सोडावी लागेल, असेही स्पष्ट केले. बैठकीतील चर्चेनुसार बँकेत सोसायटी गटातील दहा जागांपैकी वाळवा, शिराळा, तासगाव व कवठेमहांकाळ जागेवर राष्ट्रवादीने दावा केला आहे.

कडेगाव, पलूस, जत व मिरज काँग्रेसच्या वाट्याला येतील. तर खानापूर व आटपाडीची जागा शिवसेनेला दिली जाईल. महिला राखीव, नागरी बँका, इतर संस्था गटातील प्रत्येकी दोन जागा काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी एकेक मिळतील. अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय, कृषी पणन गटातील जागा राष्ट्रवादीला मिळेल. तसेच इतर शेती संस्था गटातील जागा काँग्रेसच्या वाट्याला येईल. बैठकीत आमदार बाबर यांनी शिवसेनेला चार जागा मिळाव्यात, यासाठी आग्रह धरला. तेव्हा पालकमंत्री श्री. पाटील यांनी शिवसेनेचे वरिष्ठ नेते खासदार अनिल देसाई, संपर्क प्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांच्याशी चर्चा करू, असे सांगितले. तेव्हा आमदार बाबर यांनी वरिष्ठ नेत्यांचा आदेश येईल, त्याप्रमाणे निर्णय मान्य केला जाईल, असे स्पष्ट केले.

दिवाळीनंतर घडामोडी

अर्ज माघारीसाठी आता तीनच दिवस बाकी आहेत. त्यामुळे अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर दिवाळीनंतर रविवारी (७) अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

हेही वाचा: 'वसुलीबाजीतून भरली स्वतःची तिजोरी, जनतेच्या पदरी मात्र...'

Web Title: Sangli District Bank Election Decision Take At Last From Leaders

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..