Sangli DCC - भाजप, राष्ट्रवादीची जुनी मैत्री काँग्रेसला भारी; जयंत पाटलांची भूमिका चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप, राष्ट्रवादीची जुनी मैत्री काँग्रेसला भारी!

जिल्हा बॅंक रणधूमाळी; बंदूक जमदाडेंच्या खांद्यावर अन् निशाणा साधला जगतापांनी

भाजप, राष्ट्रवादीची जुनी मैत्री काँग्रेसला भारी!

sakal_logo
By
अजित झळके

सांगली - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्वात धक्कादायक निकाल लागला जत विकास सोसायटी गटाचा. या गटात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार विक्रम सावंत यांचा धक्कादायक पराभव करत प्रकाश जमदाडे यांनी खळबळ उडवून दिली. जमदाडे मूळचे भाजपचे. ते गेले राष्ट्रवादीत. (Sangli District Bank Election) तेथे राहून त्यांनी भाजपच्या पॅनेलची उमेदवारी घेतली आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजप आणि राष्ट्रवादीच्या जुन्या मैत्रीच्या बेरजेवर काँग्रेसला धक्का दिला. (DCC Bank Election) बंदूक जमदाडे यांच्या खांद्यावर होती आणि निशाणा साधला माजी आमदार विलासराव जगताप यांनी. गेल्या निवडणुकीत जगतापांच्या मुलाचा, मनोज यांचा पराभव विक्रम सावंत यांनी केला होता. (Sangli District Bank Election results) तो हिशेब आज जगतापांनी पूर्ण केला. या खेळात पालकमंत्री जयंत पाटील यांची भूमिका मात्र चर्चेत राहिली. (Sangli DCC bank election 2021 result)

प्रकाश जमदाडे हे जत तालुक्यातील दुसऱ्या फळीतील नेते. जगतापांचे पूर्वीचे कट्टर समर्थक. जगताप तेव्हा राष्ट्रवादीत होते. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेसची सत्ता पलटून टाकण्यात जमदाडे आघाडीवर राहिले. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने तेंव्हा सत्ता मिळवली आणि त्याचे बक्षिस म्हणून जगताप यांनी जमदाडे यांना सभापतीपद दिले होते. त्यात त्यांनी छाप सोडली. पुढे जगताप भाजपमध्ये आले, जमदाडेही आले.

हेही वाचा: सांगली जिल्हा बँकेत 'या' 2 विरोधक भाऊंची दमदार एन्ट्री

२०१४ ला जगताप आमदार झाले, पुढे काही वर्षात जमदाडे यांनाही विधानसभा लढवावी, असे वाटू लागले. त्यांनी भाजपमध्ये राहूनच जगतापांशी सुरक्षित अंतर ठेवले. पक्षाचे खासदार संजय पाटील यांना नेता मानायला सुरवात केली. डिजीटल फलकावर फक्त संजयकाकांचा फोटो लावायला सुरवात केली. संजयकाकांनी त्यांना रेल्वे बोर्डाचे संचालक केले. जगतापांना ते आवडले नाही. त्यांनी संजयकाकांना समजावले, मात्र सिलसिला सुरु राहिला. हाच सिलसिला २०१९ ला जगताप यांच्या विधानसभा पराभवाच्या काही कारणांपैकी एक ठरला. जगताप आणि खासदार संजय पाटील यांच्यात दुरावा येण्यास जमदाडे काहीअंशी कारणीभूत ठरले.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादीत भरती प्रक्रिया सुरु झाली. त्यात जमदाडे यांनीही तो रस्ता धरला. अर्थात, संजयकाकांशी सलोखा कायम ठेवून ते राष्ट्रवादीत गेले. ते जगतापांपासून मात्र दुरावले होते. आता जिल्हा बँकेची निवडणूक लागली आणि हेच जमदाडे जगतापांचा बदला पूर्ण करण्यासाठीचे उमेदवार ठरले. गेल्या जिल्हा बँक निवडणुकीत जगतापांचे चिरंजीव मनोज यांचा पराभव झाला होता. विक्रम सावंत यांनी त्यांना धक्का दिला होता. आता सावंत यांच्या विरोधात भाजपच्या पॅनेलमधून लढायला राष्ट्रवादीतून जमदाडे यांना आयात करण्यात आले. ही बंडखोरी होती की ‘करेक्ट’ नियोजन, हे गुलदस्त्यातच राहिले. ही मांडणी अर्थातच जतमधील भाजप आणि राष्ट्रवादीच्या जुन्या मैत्रीचा परिपाक होता.

हेही वाचा: 'महाडिक गट, विषय कट'; वाळवा तालुक्यात जयंत पाटलांना धक्का

जतमध्ये काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादी आणि भाजपची एकी आहे. तेथे जगताप-शिंदे मैत्री राजकारणाच्या पलिकडली आहे. विक्रम सावंत यांचे वाढते प्रस्थ रोखण्यासाठी ही मैत्री यावेळी कामाला लागली. त्याआधी काँग्रेसने जतमधील राष्ट्रवादीच्या भूमिकेविषयी स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती. राज्यात महाविकास आघाडी असताना राष्ट्रवादी भाजपसोबत कशी? असा सवाल पत्रकार परिषदेत केला होता. याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला होता. त्याचा फारसा फायदा झाला नसल्याचे आजच्या निकालातून स्पष्ट झाले.

loading image
go to top