सांगलीः लोकसभा दारी; तरी निश्‍चित नाही उमेदवारी

शेखर जोशी
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

देशभर लोकसभेचे नगारे वाजू लागले असताना काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला सांगली लोकसभा मतदारसंघात या पक्षाला उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचा उमेदवार कोण याबद्दल जशी अनिश्‍चितता आहे तशीच उमेदवारीबाबत अनास्थाही  आहे. त्याचवेळी अडीच लाखांच्या मताधिक्‍याने इतिहास घडविणाऱ्या भाजपच्या विद्यमान खासदार संजय पाटील यांना पुन्हा संधी दिली तर गेम बसेलच का याबाबतही पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात संभ्रमावस्था दिसतेय. 

देशभर लोकसभेचे नगारे वाजू लागले असताना काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला सांगली लोकसभा मतदारसंघात या पक्षाला उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचा उमेदवार कोण याबद्दल जशी अनिश्‍चितता आहे तशीच उमेदवारीबाबत अनास्थाही  आहे. त्याचवेळी अडीच लाखांच्या मताधिक्‍याने इतिहास घडविणाऱ्या भाजपच्या विद्यमान खासदार संजय पाटील यांना पुन्हा संधी दिली तर गेम बसेलच का याबाबतही पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात संभ्रमावस्था दिसतेय. 

सांगली लोकसभेचा सामना भाजप विरुद्ध काँग्रेस असाच थेट असेल हे निश्‍चित आहे आणि भाजपकडून पुन्हा संजय पाटील यांनाच उमेदवारी असेल याबाबतही  बहुतांशी खात्री दिली जाते. काँग्रेसच्या इतिहासात प्रथमच यावेळी वसंतदादा कुटुंबाहेर उमेदवारी दिली जाऊ शकते अशी ठोस शक्‍यता निर्माण झाली आहे.

नेते पतंगराव कदम व मदन पाटील यांच्या पश्‍चात काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री  प्रतीक पाटील यांचा फार मोठ्या फरकाने पराभव झाला. त्यानंतर साडेचार वर्षे अज्ञातवासातच आहेत. त्यामुळे ते रिंगणात असतील की त्यांचे धाकटे बंधू विशाल रिंगणात याबद्दल पहिल्यांदा चर्चा सुरू झाली. पतंगराव असते तर ते नक्की काँग्रेसचे उमेदवार असते आता इथे तगडा उमेदवार द्यायचा तर आमदार विश्‍वजित कदम यांची चर्चा सुरू झाली.

मात्र सध्या विशाल आणि विश्‍वजित यांच्यात ‘पहले आप.. पहले आप’ अशी चर्चा सुरू आहे आणि दोघेही पक्षश्रेष्ठी ज्यांना उमेदवारी देतील त्यांना निवडून आणू असे सांगत आहेत. असं चित्र पहिल्यांदाच  दिसतेय. या यादीत आता काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, श्रीमती जयश्रीताई पाटील यांचीही नावे चर्चेत आली आहेत. मात्र ती मागे राहतील. ती नावे चर्चेत  यायचे कारण यासाठी की विशाल आणि विश्‍वजित या दोघांनाही विधानसभेत अधिक रस आहे.

भाजपकडून पुढे उमेदवार कोण दिला जाईल याबाबतही आडाखे काँग्रेसकडून बांधले जात आहेत. त्याचे कारण म्हणजे मोदी लाटेवर स्वार होऊन दिल्लीत गेलेल्या  संजय पाटलांबद्दल वाढत चाललेली नाराजी. ही नाराजी पक्षांतर्गतच सुरू झाली. गोपीचंद पडळकर या  असंतोषाचे जनक ठरले. त्यानंतर अजितराव घोरपडे, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार विलासराव जगताप, सुरेश खाडे यांनी थेट किंवा अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे.

आमदार सुधीर गाडगीळ उघडपणे नसले तरी अंतर्गत नाराज आहेत. त्यामुळे संजय पाटलांना पर्याय मिळाला तर त्यांचा पत्ता भाजपचे शीर्ष नेतृत्व त्यांचा  पत्ता कट करू शकते. गडकरींच्या उपस्थितीतील मेळाव्यात नागजच्या मेळाव्याच्या निमित्ताने खासदारांनी आपला दावा सेफ करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना भाजपमध्ये पर्याय कोण हा प्रश्‍न ओघानेच येतो. त्यात अजितराव घोरपडे, पृथ्वीराज देशमुख, दीपक शिंदे, मकरंद देशपांडे आणि नीता केळकरांपर्यंतची येथील भाजपच्या पहिल्या फळीतील नावे पर्याय म्हणून चर्चेत  येत असतात आणि त्यांच्या मर्यादाही चर्चेत येतात. आता २४ जानेवारीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाच सांगलीत येणार आहेत. त्यावेळी बऱ्यापैकी भाजपच्या उमेदवारीबाबतचे चित्र स्पष्ट होईल. भाजपमधील सूत्रांनुसार खासदार पाटील स्वत: लढण्याबाबत असमर्थता दाखवत नाहीत तोपर्यंत तेच उमेदवार असतील अन्यथा नाही.

काँग्रेसच्या उमेदवार निश्‍चितीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा फॅक्‍टर महत्त्वाचा असेल. त्यांनी तसे थेट सूचित केलेय. त्यांचा ‘तगडा’ उमेदवार विश्‍वजित असू शकतो कारण त्यांचे विशाल यांच्याबाबतचे ‘प्रेम’ सर्वज्ञात. कधीकाळचे घनिष्ठ संजय पाटील आता जयंतरावांच्या गुड बुक मध्ये नाहीत. मात्र वसंतदादा घराण्याला उमेदवारी दिली तर जयंतरावांचे नेटवर्क कोणाच्या बाजूने असेल याची गॅरेंटी नाही. त्यामुळे  येथील राजकीय गणिते पाहिली तर काँग्रेस हायकमांडकडून विश्‍वजित यांनाच उमेदावारीसाठी आग्रह होईल. मग कडेगाव-पलूसमधून कोण याचा विचार नंतर केला जाईल, असाही एक तर्क आहे. पृथ्वीराज पाटील यांचे नाव खासदारकीसाठी नॉमिनी म्हणून होणे हे देखील त्यांनी आतापर्यंत आंदोलनांचे फलितच आहे.

कदम गटाकडून मदन पाटील यांच्या पत्नी श्रीमती जयश्रीताई यांचेही नाव खासदारकीसाठी पुढे केले जाईल. पृथ्वीराज पाटील देखील कदम गटाकडूनच पुढे येतील. ही चर्चा असली तरी प्रतीक पाटील यांचा थेट दहा जनपथशी असलेला संपर्क पाहता ते रेसमधून बाहेर पडले असे मात्र कोणी म्हणून शकणार नाही. ‘वसंतदादा’ नावाचा पासंग त्यांच्याकडे नक्की असेल. त्यामुळेच विशाल यांचाही विचार होऊ शकतो. दादा घराण्याला जर सांगली विधानसभा दिली तर ते लोकसभेसाठी आग्रही राहणार नाही. पण यात पुन्हा काँग्रेस अंतर्गत गटांत समझोता घडविणे हे देखील पहिले आव्हान असेल. त्यामुळे गटबाजीने पोखरलेला भाजपची आजही सारी भिस्त मोदी लाटेवरच असेल. महापालिकेतील विजयाने ती अद्याप टिकून आहे असा भाजपच्या मंडळीचा दावा आहे. काँग्रेसमधील संभ्रमावस्था हेच भाजपचे सध्याचे सर्वात मोठे बलस्थान आहे.

Web Title: Sangli Dot Com on Loksabha Election