सांगली : मोरगावजवळ अग्रणीच्या पुरात वडील - मुलीचा मृत्यू 

सांगली : मोरगावजवळ अग्रणीच्या पुरात वडील - मुलीचा मृत्यू 

कवठेमहांकाळ - तालुक्‍यातील मोरगाव येथील अग्रणी नदीवर आलेल्या पूरात सात वर्षाच्या मुलगीसह वडील वाहून गेल्याची घटना रविवारी (ता. 6) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. शनिवारी (ता. 5) मध्यरात्री मुसळधार पावसाने नदीला पूर आला होता.

तालुक्‍यात प्रथमच मोरगावच्या अग्रणी नदीवर पूरात वडीलासह मुलगी वाहून गेली. योगेश पवार (वय 38) व मुलगी श्रेया पवार (वय 8) हे बाप व लेक वाहून गेले. ओंकार पवार (वय 22) हाही पाण्यात पडला होता. तो पोहत आल्याने वाचला. तब्बल अकरा तासांच्या प्रयत्नानंतर नदीपासून अर्धा किलोमीटरवर योगेश पवार यांचा मृतदेह सापडला. आज (रविवारी) रात्री नदीपात्रात बोटीच्या साहाय्याने श्रेयाचा शोध घेण्याचे कार्य सुरूच होते. 

घटनास्थळावरून मिळालेलली माहिती अशी, की शनिवारी रात्रीच्या मुसळधार पावसामुळे अग्रणी दुथडी भरून वाहत आहे. योगेश पवार, मुलगी श्रेया पवार आणि ओंकार पवार हे आज पहाटेच्या साडेपाचच्या सुमारास मोटारसायकलवरून नवरात्रोत्सव सुरू असल्याने महांकाली मंदिरात आरतीसाठी कवठेमहांकाळा येत होते.

नदीजवळ आले असता पाण्याचा अंदाज न आल्याने योगेश पवार मोटारसायकलसह पाण्यात पडले. गाडीवरील तिघेही पाण्यात पडले. योगेश व श्रेया प्रवाहाबरोबर वाहत गेले. ओंकार पोहत नदीकाठावर आला. त्याने ही घटना नजीकच्या नागरिकांना सांगितली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत सर्व बंधाऱ्यांपर्यत काठावरून पाहणी केली. तब्बल अकरा तासांच्या प्रयत्नानंतर योगेश यांचा मृतदेह सापडला. 

दरम्यान, नदीपात्रात बोटीच्या साहाय्याने श्रेयाचा शोधकार्य सुरू होते. प्रशासन व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मिरजेहून बोट मागवण्यात आली. तहसिलदार बी. जी. गोरे, पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहूल कोंळबेकर यांनी भेट दिली. 

नदीला प्रथमच पूर 

कवठेमहांकाळ तालुक्‍याच्या पश्‍चिम विभागातील मोरगावनजीक अग्रणी नदीला प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर आला. पूरात बाप-लेक वाहून गेल्याची दुर्देवी घटना घडली. या घटनेने हळहळ व्यक्त होत होती. नदीकाठी जमलेल्या नागरिकांनी शोध मोहिमेत पोलिस, प्रशासनाला हातभार लावला. 

अग्रणी नदीच्या रस्त्यावरील चढ-उतार काढण्याची गरज 

मोरगाव ते कवठेमहांकाळ मार्गावर अग्रणी नदीचा पूल आहे.पूलच्या रस्त्याच्या दोन्हीही बाजूस चढ-उतार आहे.रस्त्यावरून जाताना देशिंगकडे जाताना पूलानजीक असलेला चढ तर कवठेमहांकाळकडे जाताना असलेला चढ काढण्याची गरज आता निर्माण झाली आहे.यातच नदीवर संरक्षक भिंत बांधण्याची आवश्‍यकता आहे. 

कुटुंब उघडयावर... 
योगेश पवार यांचा इलेक्‍ट्रिक मोटार बांधणीचा व्यवसाय आहे. कवठेमहांकाळ ते मोरगाव असा प्रवास ते करत होते.त्यांना श्रेया वय वर्षे आठ आणि लहान मुलगा असून आता योगेश पुरात वाहून गेल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला.पहाटेपासून दुपारपर्यंत कवठेमहांकाळच्या पश्‍चिम भागात असलेल्या देशिंग, खरशिंग,हरोली,मोरगाव तसेच दक्षिणेकडे असलेली कोंगनोळी हिंगणगाव,करोली या गावाकडचा संपर्क तुटला होता. दुपारी पाणी हळूहळू कमी आल्यानंतर जनजीवन जनजीवन पूर्ववत झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com