दारू, पैसे वाटपावर कारवाईसाठी 30 पथके

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

दत्तात्रय शिंदे : 3 हजारहून अधिक पोलिसांचा बंदोबस्तही तैनात

 

सांगली-: निवडणुकीत पैसे, दारू आणि मोफत वस्तू वाटप करणाऱ्यांवर कारवाईसाठी जिल्ह्यात 30 स्वतंत्र पथके कार्यरत केली आहेत. 3 हजारहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त मतदान आणि मतमोजणीसाठी तैनात राहील, अशी माहिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दत्तात्रय शिंदे : 3 हजारहून अधिक पोलिसांचा बंदोबस्तही तैनात

 

सांगली-: निवडणुकीत पैसे, दारू आणि मोफत वस्तू वाटप करणाऱ्यांवर कारवाईसाठी जिल्ह्यात 30 स्वतंत्र पथके कार्यरत केली आहेत. 3 हजारहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त मतदान आणि मतमोजणीसाठी तैनात राहील, अशी माहिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, ""जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक होत असलेल्या मतदारसंघांत 21 पोलिस ठाण्यांचा समावेश होतो. तेथे आचारसंहिता कक्ष आहे. तेथे अहोरात्र एक अधिकारी व दोन कर्मचारी नेमले आहेत. निवडणुकीत पैसे, दारू आणि मोफत वस्तू वाटप करणाऱ्यांवर कारवाईसाठी जलद कृती दल 10, भरारी पथके 10, स्टॅटिक सर्व्हेलन्स पथके 10 याप्रमाणे तीस पथके तैनात केली आहेत. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर 11 जानेवारीपासून अवैध दारूच्या 111 केसेस करून 3 लाख 22 हजार रुपये जप्त केले. जुगाराच्या 174 केसेस करून 16 लाख 91 हजार रुपये जप्त केले. या काळात 1890 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.''

श्री. शिंदे म्हणाले, ""निवडणूक काळात 1580 पैकी 1120 जणांवर वॉरंट बजावण्यात आले. पोलिसांनी अनधिकृत डिजिटल, जाहिरात फलक यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले आहे. या काळात 21 वेळा नाकाबंदी करून 5 वेळा ऑलआउट ऑपरेशन मोहीम राबवली. नाकाबंदी आणि ऑलआउटमध्ये वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या 3911 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून 5 लाख 26 हजार रुपये दंड वसूल केला. पोलिस ठाणे स्तरावर जातीय दंगा काबू योजनेअंतर्गत 25 वेळा प्रात्यक्षिक केले. 10 ठिकाणी रूट मार्च घेण्यात आले. मतदानादिवशी 127 वाहनांतून सतत गस्त घातली जाईल. आदर्श आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.''

असा असेल बंदोबस्त-
अधीक्षक-1, अपर अधीक्षक- 1, उपाधीक्षक- 9, पोलिस निरीक्षक- 97, सहायक निरीक्षक- उपनिरीक्षक- 97, पोलिस कर्मचारी- 2230, होमगार्ड- 600, राज्य राखीव दल कंपनी- 1, जीप- 95, मोठी वाहने- 32, बिनतारी संच- 139 असा बंदोबस्त तैनात राहील. अधीक्षक व अपर अधीक्षकांसमवेत एक स्ट्रायकिंग फोर्स, राखीव स्ट्रायकिंग फोर्स- 11, नियंत्रण कक्षाकडे राखीव स्ट्रायकिंग फोर्स- 4 कार्यरत असेल.

 

येथे तक्रार करा-
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांच्या तक्रारीसाठी नियंत्रण कक्षाकडील दूरध्वनी 0233- 2672100 किंवा पोलिस ठाण्याकडील आचारसंहिता कक्षाकडील दूरध्वनी 0233- 2672696 कार्यरत राहील. तक्रारीची तातडीने दखल घेतली जाईल.

Web Title: sangli: election, police and wine