ढगाळी वातावरणाचा सांगलीच्या शेतकर्यांनी का घेतलाय धसका?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

जिल्ह्यात गेली तीन दिवस ढगाळ वातावरण अन्‌ पावसाच्या शिडकाव्याने बागायतदार हबकलेत.

सांगली - ढगाळी वातावरण, हलक्‍या पावसाचा मुक्काम आणखी चार दिवस राहण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील फुलोऱ्या टप्प्यासह थिनिंग, जीए आणि खते देण्याची थांबवून सध्या डाऊनी, गळ रोखण्यासाठी दिवसातून तीन-चार फवारण्या सुरू आहेत. रात्रंदिवस फवारणीसाठी टॅक्‍टरची चाके सुरू आहेत. या काळात जी. ए. टॉनिक, खतांचे डोस पुन्हा सक्तिने थांबवावे लागले आहेत. डाऊनी, भूरीपासून बचावासाठी थिनिंगही लांबवावे लागणार आहे. द्राक्षाला उशिरा झाला तरी हरकत नाही, मात्र बागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांची जिद्द आजही कायम आहे. रविवारपर्यंत (ता. 8) खराब वातावरणांचा अंदाज आहे. 

डाऊनी, भूरी, कुजव्या रोग रोखण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड  

जिल्ह्यात गेली तीन दिवस ढगाळ वातावरण अन्‌ पावसाच्या शिडकाव्याने बागायतदार हबकलेत. जिल्ह्याच्या काही भागात मंगळवारी पहाटे साडेसहा आणि दुपारी पाच वाजता हलका पाऊस झाला. येणारे चार दिवस असेच वातावरण राहील, असा हवामान खाते आणि तज्ज्ञांचा अंदाज आहे. पावसाची शक्‍यता कमी असली तरी या वातावरणामुळे डाऊनी, भूरी, कुजव्या रोखण्यासाठी विविध टप्प्यातील शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. दिवसातून तीन-चारदा टॅक्‍टरद्वारे फवारणी सुरूच ठेवल्या आहेत. कृषी दुकान, सल्लागार, द्राक्ष बागांच्या डॉक्‍टरांचे दूरध्वनी सातत्याने व्यस्त आहेत. अर्धा-तास, तासाभरांनी संपर्क झाल्यानंतर फवारणीसाठी स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा वापर सुरू आहे. जिल्ह्यातील सुमारे 40 हजार एकरांवरील बागा सध्या फुलोऱ्यात आहेत. 

महागड्या औषधांची फवारणी सुरू

दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी, अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादकांना बसला. मागास छाटणी घेतलेल्या शेतकऱ्यांच्या बागा फुलोऱ्यात आहेत. फुलगळ होऊ नये म्हणून तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार फवारण्या आणि ठिबकद्वारे खत देण्याचे नियोजन सुरू आहे. पाने, द्राक्ष घडावर डावूनी रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. बागा वाचवण्यासाठी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. द्राक्षाच्या कोवळ्या पानांवर डावूनचे ठिपके पुन्हा दिसताहेत. पाने, घडावर त्याचा प्रादुर्भाव होऊ लागला. सध्या काही 90 दिवसांच्या बागांमधील द्राक्षे मऊ पडत आहेत. या वातावरणामुळे पाऊस झाल्यास घडांची कुज व घड नासून नुकसान होण्याची धास्ती बागायतदारांना बागा वाचवण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी सुरू आहे. . 

कोणत्याही स्थितीतील बागांसाठी वातावरण धोक्‍याचेच आहे. बागांवर डावूनीचा हल्ला होऊ नये, यासाठी या काळात थिनिंग टाळावे, नत्रयुक्तच नव्हे सर्व खतांचे डोस थांबवावेत. जी. ए., टॉनिक फवारणी उघडिपीनंतरच करावी. प्रथम बागा वाचवायला प्राधान्य अन्‌ मग अन्य बाबींचा शेतकऱ्यांनी विचार करावा.' 
एन. बी. म्हेत्रे, द्राक्ष तज्ज्ञ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli farmers take a scare because of cloudy weather