सांगलीतील मदतीत कोयनेचे सुपुत्र!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम जवळ जवळ संपत आले असून, गावांमध्ये अडकलेल्या जनावरांना चारा न्यायचे काम सातत्याने करावे लागत आहे. यामुळे बोटींवर सातत्याने परिश्रम घ्यावे लागत आहेत.
- दीपक धनावडे, बोटचालक, तापोळा

कास - ज्या कोयना धरणातील पाण्याने सांगली जिल्ह्यात हाहाकार माजवला. लाखो लोकांना बेघर केले, त्याच सांगली जिल्ह्यातील मदत कार्यात बामणोली, तापोळा येथील बोटचालक अथक परिश्रम करत असून, कोयनेच्या अथांग शिवसागर जलाशयात लीलया बोटी हाकणारे हे बोटचालक कृष्णाच्या पुरातही आपले कौशल्य पणाला लावून मदत करत आहेत. 

गेल्या दहा दिवसांपासून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत पुराने हाहाकार माजवला. अनेक गावे पुराच्या विळख्यात सापडली. प्रशासनाने सुरवातीला जास्त गांभीर्याने न घेतलेल्या या पुराने नंतर रौद्ररुप दाखवल्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली. सुरवातीला पाच ते दहा बोटींवर मदत कार्य करणाऱ्या प्रशासनाला नंतर कोयनेच्या शिवसागर जलाशयातील बोटींची आठवण झाली.

अखेर तापोळा आणि बामणोलीतील काही बोटी व चालक सांगली जिल्ह्यात पाठवण्यात आले. हे सर्व बोटचालक आपले घरदार सोडून चार दिवसांपासून सांगलीत काम करत आहेत. या कठीण प्रसंगात मदत करणाऱ्या या भागातील या बोटचालकांची आठवण प्रशासनास झाली; पण इतर वेळी याच बोटचालकांची बामणोली व तापोळा येथे नियमांवर बोट ठेवून कोंडी केली जाते. त्यामुळे कधीही मदतीला धावणाऱ्या बामणोली व तापोळा येथील बोटचालकांना कायमस्वरूपी परवाने देवून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे. या कामात विलास नारायण सकपाळ व नीलेश नारायण सकपाळ (दोघे रा. अंबवडे, ता. जावळी), दीपक धनावडे, विजय धनावडे, प्रकाश सपकाळ (तापोळा) या सर्वांच्या बोटी नांद्रे-सांगली येथे आहेत. तर अजून चार ते पाच बोटी सांगली स्टॅंडवर कार्यरत आहेत.

गणेश ऊतेकर (वानवली), संकेत सकपाळ, दगडू सकपाळ (अहिर), धोंडिबा धनावडे, आनंद धनावडे, आनंद धनावडे, प्रतीक धनावडे, कुंदन धनावडे, गणेश भोपळे, विलास कारंडे, चंद्रकांत दाराशीवकर (सर्व तापोळा), राम सकपाळ (वेळापूर), नितीन भोसले (तेटली) हे ही या कार्यात सहभागी होवून मदत करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Flood Boat Help