#SangliFlood गणपती मंदिरात एक हजार पूरग्रस्तांचे स्थलांतर

बलराज पवार
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

सांगली - सांगलीचे आराध्य दैवत मानले जाणारे गणपती मंदिर आज खऱ्या अर्थाने पूरग्रस्तांसाठी विघ्नहर्ता ठरले आहे. या मंदिरात एक हजार पूरग्रस्तांचे तसेच पांजरपोळ मधील 50 गाईंच्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. 

सांगली - सांगलीचे आराध्य दैवत मानले जाणारे गणपती मंदिर आज खऱ्या अर्थाने पूरग्रस्तांसाठी विघ्नहर्ता ठरले आहे. या मंदिरात एक हजार पूरग्रस्तांचे तसेच पांजरपोळ मधील 50 गाईंच्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. 

सांगलीचे गणपती मंदिर सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचा आहे. मंदिराच्या मागूनच कृष्णा नदी वाहते. याच नदीला सध्या महापूर आला आहे, मात्र या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून ते थोडे उंचावर असल्यामुळे पुराचे पाणी या मंदिरात येत नाही. यंदा 2005 च्या पुरापेक्षा मोठा पूर आला आहे तरीही मंदिराच्या मुख्य दरवाजापर्यंतच पाणी आले आहे.  पटवर्धन सरकारांच्या मालकीचे असणारे गणपती मंदिर हे संस्थानकालीन आहे. 

मंदिराच्या जवळच असलेल्या गवळी गल्ली, मगरमच्छ कॉलनी या परिसरात पुराचे पाणी आहे. या वसाहतीमधील नागरिकांचे या मंदिरात स्थलांतर करण्यात आले आहे.  मंदिराच्या शेजारीच गाईंचे पांजरपोळ आहे. येथील गाईंना मंदिर परिसरात स्थलांतरित केल्या आहेत.  

माजी नगरसेवक शेखर माने यांनी सांगलीचे संस्थानिक राजे विजयसिंह पटवर्धन यांच्याशी संपर्क साधून मंदिराच्या परिसरात पूरग्रस्तांची सोय करावी अशी विनंती केली. त्याला विजयसिंहराजे पटवर्धन यांनी मान्यता दिली. यानंतर मंदिराच्या परिसरात पूरग्रस्तांचे आणि जनावरांचे पुनर्वसन करण्यात आले. 

या एक हजार नागरिकांना गणपती संस्थान तसेच रुद्राक्ष स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून जेवणाची सोय करण्यात येत आहे तर गाईंसाठी चारा आणि पाण्याची सोय करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते अंकुश जाधव, संजय चव्हाण हे या पूरग्रस्तांना मदत करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Flood One thousand flood victims migrate to Ganapati Temple