#SangliFloods या पाच आंबेकऱ्यांमुळेच रेठरे हरणाक्षचे गावकरी सुरक्षितस्थळी

#SangliFloods या पाच आंबेकऱ्यांमुळेच रेठरे हरणाक्षचे गावकरी सुरक्षितस्थळी

इस्लामपूर - जीवावर उदार होऊन गावातील सुमारे साडे तीन हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे धाडस रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथील 'त्या' पाच आंबेकरींनी दाखवले. पूर ओसरू लागला आहे, नुकसानभरपाई, मदतीचे कवित्व एकीकडे सुरू आहे तर दुसरीकडे या आंबेकऱ्यांचेही तितकेच कौतुक ग्रामस्थ करू लागले आहेत.

कासीम शहाबुद्दीन आंबेकरी (वय ७०), सिकंदर आंबेकरी (३२), साहिल रमजान आंबेकरी (१९), नजीर दस्तगिर आंबेकरी (४०) आणि रमजान यासीन आंबेकरी (४०) अशी त्या पाच जणांची नावे आहेत. रेठरे हरणाक्ष गावातच नदीकाठावरील चौंडेश्वरी मंदिराजवळ हे सगळे राहातात. 

संपुर्ण शेती पाण्याखाली आणि जिवंत जनावरे डोळ्यादेखत पाण्यातून वाहून जाताना पाहण्याचे दुर्भाग्य रेठरे हरणाक्षच्या शेतकऱ्यांच्या वाट्याला आले. पाहाता पाहाता पडलेला पुराचा वेढा, बंद झालेले वाहतुकीचे मार्ग आणि कोणत्याही यंत्रणेशिवाय गावाने स्वतःहून मदतयंत्रणा राबवली. त्यात या आंबेकऱ्यांचे मोठे योगदान आहे. ९० टक्के गाव व शिवार पाण्याखाली गेलेले. गावासाठी जिल्ह्यातील सर्वात उंच पूल आहे; मात्र या पुलाच्या दोन्ही बाजूस बतकल असल्याने गावाचा संपूर्ण वाळवा तालुक्याशी संपर्क तुटला होता. या स्थितीत आंबेकऱ्यांनी साडेतीन हजार लोकांना सुखरूप सुरक्षितस्थळी हलवले.

दुर्दैवाने ज्या बोटीतून हा सगळा पराक्रम घडला, ती बोट नादुरुस्त होती. बोटीच्या फाटलेल्या पत्र्याला तात्पुरते एमसील लावले होते. मुसळधार पाऊस, कोयनेतून वाढणारा विसर्ग आणि नदीपात्रात वाढणारे पाणी पाहता सोमवारी रात्री साडे आठ वाजता नाव पाण्यात ढकलली. हे पाचजण न थकता पूर्ण रात्र पाण्यात होते. काहींना पूर वाढेल याचा अंदाज नसल्याने फार लोक बाहेर पडले नाहीत. मात्र दुसऱ्या दिवशी पाण्याची तीव्रता वाढली तसे लोक हलले. बोटीची क्षमता अवघ्या १० - १२ जणांची असतानाही सुमारे ३५ - ४० व्यक्तींची ने आण सुरू होती. सलग चार दिवस, गुरुवारी रात्री उशिरापर्यंत हे काम अव्याहतपणे सुरू होते. या परिस्थितीतही बोटीचे चार वाल्हे मोडले. ते जागेवरच दुरुस्त करून काम सुरूच ठेवले. २००५ ला गावाला बोट मिळालेली. त्यानंतर त्याकडे म्हणावे असे लक्षच दिले गेले नाही. नाव नदीजवळच होती. वापर कमी असल्याने नादुरुस्त होती. 

पुरात लोकांची ने आण सुरू असताना तीनवेळा बोट पलटी होताना वाचली. एकदा झाली, पण लोकांनी प्रसंगावधान राखून खाली उतरून नाव सावरली; अन्यथा ब्रह्मनाळसारखी दुर्घटना इथेही घडली असती. केवळ आंबेकऱ्यांचा पूर्वानुभव आणि दक्षता यामुळे दुर्घटना टळली. ग्रामपंचायत चौकातून लोकांना नावेत घेऊन बाबाजींचे घर असलेल्या ठिकाणावर लोकांना सोडून पुन्हा मागे त्याच वेगात ते येत होते. काही घरांमध्ये रुग्ण होते, काही महिला बाहेर पडत नव्हत्या, तर त्यांना जबरदस्तीने बाहेर काढण्याची वेळ आली. सीआरपीएफचे जवान गावात पोचण्यापूर्वीच लोकांचे मदतकार्य पूर्ण झाले होते.

"माझा जन्म १९५० चा. मी हा चौथा महापूर पाहिला. याआधी इतका भीषण महापूर पाहिला नव्हता. नावेची अवस्था खराब आहे. पुरात कशी वापरली आमची आम्हालाच माहिती. गावाला नवी नाव मिळाली पाहिजे."
- कासीम आंबेकरी

"आंबेकरींनी पुरात मोठे योगदान दिले. त्यांना मदत करण्याची भावना सर्वांचीच आहे. आमदार जयंत पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्यातील एकाला नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत."
- जे. डी. मोरे,
माजी सरपंच.

"आंबेकरींना कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहोत."
- उमेश पवार,
माजी उपसरपंच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com