#SangliFloods धन्यांनी दावी तोडली; जित्राबांनी साथ निभावली !

#SangliFloods धन्यांनी दावी तोडली; जित्राबांनी साथ निभावली !

तुंग - जनावरांनासुद्धा भावना असतात. त्यांना माणसांसारखा जीव लावला की ती माणसाळतात. यातूनच पशू व मानव यांच्यात नाते निर्माण होते. अशाच या  ममत्वाने कसबे डिग्रज (ता. मिरज) मधील १०५  पैकी ८५ गाय व म्हशींचा जीव वाचला. एखाद्या चित्रपटातील प्रसंगासारखी ही घटना कसबे डिग्रजपासून दोन किलोमीटरवर असणाऱ्या नदीकाठावरील कदम वस्ती येथे महापुरात घडली...

कसबे डिग्रज ब्रह्मनाळ रस्त्यावर कृष्णा नदीकाठावर कदम वस्ती आहे. येथे तीन पिढ्यांपासून १७ कुटुंबे राहतात.  नोकरीच्या मागे न लागता शेती व पशुपालन हा त्यांचा मुख्य व्यवसाय बनला आहे. कदमवस्तीत रघुनाथ कदम, आनंदराव कदम, जीवन कदम, संदीप कदम, सुरेश कदम, जनार्दन कदम, बाळू कदम, राजाराम कदम, विजय पिंपळे, धनाजी पिंपळे, तानाजी पिंपळे, सुरेश फारणे, अशोक फारणे आदींचे गाई-म्हशींचे मोठे गोठे आहेत. प्रत्येकाच्या दावणीला १५ ते २० अशी जवळपास दीडशे जनावरे आहेत. संथ वाहणाऱ्या  कृष्णामाईच्या कुशीत वावरणारी ही जनावरे कधीकाळी  कृष्णेच्या डोहात मुक्तपणे संचारली भिजली होती. परंतु कृष्णा कोपली आणि तिच्या महापुराचा कदम वस्तीला मोठा फटका बसला. पिके व वस्ती पाण्याखाली राहिली. शेतीचे मोठे नुकसान झाले. कधीकधी नदीत मुक्त पोहणाऱ्या या जनावरांच्या भेटीसाठी कृष्णामाई चक्क गोठ्यापर्यंत आली.

एक-दोन दिवस थांबेल आणि २००५ प्रमाणे निघुन जाईल या आशेवर मालकांती दावणीची जनावरे तशीच ठेवली. पावसाचा जोर वाढला अन पाण्याने जित्राबांच्या गळ्याला स्पर्श केला. अतापर्यंत नदीकाठ सधन करणाऱ्या कृष्णामाईच्या या रौद्ररूपाने कदम वस्ती भयभीत  झाली. वस्तीवरील सगळ्यांनी एकत्र येत दावणीची सर्व जनावरे सोडून अर्धा किलोमीटरवरील उंचवट्याच्या ठिकाणी एकत्रित बांधली.

वस्तीवरील महिलासह लेकरांना काहिलीतून बाहेर काढून त्यांना तुंग, कारंदवाडी, मिरजवाडी व पाहुण्यांच्या ठिकाणी पाठवले. जनावरासोबत काही पुरुष मंडळी तिथेच थांबून राहिली. मात्र कृष्णेचे पाणी झपाट्याने वाढत पुन्हा जनावरांच्या गळ्यापर्यंत आले. आता मात्र मालकानी वाढत्या पाण्याचा धसका  घेतला. गावाकडील रस्ताही पाण्याखाली गेला. गावापासून दूर असल्याने एवढ्या जनावरांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढणेही आता शक्‍य नव्हते.

त्यामुळे मनावर दगड ठेवत सगळ्यांनी एकत्र निर्णय घेतला, पाच सहा वर्षे सांभाळलेल्या जनावरांना दावणीला मरू देण्यापेक्षा त्यांची दावी तोडावीत. त्यामुळे पाण्याच्या प्रवाह बरोबर वाहत जाऊन वाचतील अशी त्यांची भावना होती. डोळ्यातुन आसवे गाळत उंचवठ्यावर बांधलेल्या सगळ्या जनावरांची विळ्याने दावी तोडली. या प्रसंगाचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. आपल्या जित्रबांचा अखेरचा निरोप घेत काळजावर दगड ठेऊन ते कहिलीतून बाहेर पडले. दुसऱ्याच्या ओसरीला राहिले, पण उघड्यावर पडलेला संसार आणि जीवाला जीव लावून सांभाळलेली लाखमोलाची जनावरे डोळ्यांसमोरून जात नव्हती...

दरम्यान, चार दिवसांत पाणी स्थीर होऊन हळूहळू ओसरू लागले. मोठ्या आशेने वस्तीवरील चौघेजण काहिलीतून जनावरे बांधलेल्या ठिकाणी पोचले. दोन चार म्हैशी व रेडकाचे फुगलेले शरीर पाहुन बाकीच्यांचे काय झाले आसेल या विचाराने  काळजात धस्स झाले; पण देव तारी त्याला कोण मारी या उक्तीचा प्रत्यय यावेळी त्यांना आले. आठवडाभर कृष्णेच्या विळख्यात राहिलेल्या जनावरांना धन्याचे दर्शन होताच ती हंबरायला लागली. आजूबाजुच्या ऊसाच्या शिवारातून गायी-म्हैशी बाहेर आल्या तसे धन्यालाही भरून आले.

निसर्गाचा चमत्कार, कृष्णामाईची कृपा आणि जनावरांसोबत ममत्वाने वागल्यामुळे १०५ पैकी ८५ जानावरे त्याच परिसरात जिवंत सापडली. आजूबाजूला असलेल्या ऊसामुळे त्याच परिसरात अडकून राहिली. लहान-मोठ्या वीस जनावरांनी सोबत्यांची व दावणीची साथ सोडत कृष्णामाईला जवळ केले...
कृष्णामाई आता पात्रात विसावली आहे. कदमवस्तीही या घटनेतून सावरत पुन्हा नव्या जोमाने घर संसार उभा करत आहे. तर दावणीतल्या कमी झालेल्या आपल्या सहकाऱ्यांच्या आठवणीने जित्राबं आणि मालकही व्याकुळ आहेत...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com