सांगलीने दिली राज्याच्या सहकाराला दिशा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगलीने दिली राज्याच्या सहकाराला दिशा

सांगलीने दिली राज्याच्या सहकाराला दिशा

स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राचे राजकारण सहकाराभोवती फिरत राहिले. मात्र सहकार आणि राजकारणात सूक्ष्म अशी फारकत असली पाहिजे या विचाराने जिल्हा बँकेचे राजकारण दीर्घकाळ हाताळले गेले. विशेषतः १९८० च्या दशकापर्यंत तरी अर्थकारणात राजकीय हस्तक्षेप कमीत कमी राहिला पाहिजे असाच विचार जिल्ह्यातील राजकीय नेतेमंडळींचा असायचा. तसे स्वातंत्र्य बँकेच्या अध्यक्ष संचालक मंडळाला असायचे. बँकेच्याच या प्रदीर्घ कालखंडावरच नव्हे तर राज्याच्या सहकार क्षेत्रावरही सहकार प्रबोधनकार गुलाबराव पाटील यांच्या मोठा प्रभाव राहिला. खासगी क्षेत्रातील व्यावसायिकपणा येण्यासाठी सहाकारात प्रशिक्षित मनुष्यबळ आले पाहिजे यासाठी सहकार प्रशिक्षण केंद्र स्थापनेत पुढाकार घेतला. सांगली जिल्हा बँकेत घडलेल्या या नेतृत्वाने राज्याच्या सहकाराला दिशा दिली.

१९६० ला राज्य स्थापनेनंतर महाराष्ट्राची वाटचाल कृषी-औद्योगिक अशी एकत्रितरीत्या असेल असा इरादा व्यक्त करीत या दोन्ही क्षेत्रात सहकार असेल आणि त्यात सरकार आपली भागीदारी करेल असा रोडमॅपच पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मांडला. त्यांचा हा दृष्टिकोन ओळखणाऱ्या राज्यातील काँग्रेस नेतृत्वाच्या फळीतील एक नेतृत्व म्हणजे गुलाबराव पाटील होते.

हेही वाचा: चिक्कोडी तालुक्यातील पूरग्रस्तांना चिंता; उत्पादन घटण्याची भीती

वसंतदादांना सांगलीच्या राजकारणात मदत व्हावी म्हणून साताराच्या न्यायालयात वकिली करणाऱ्या गुलाबरावांना सांगलीत जाण्याचा आदेशच यशवंतरावजींनी दिला. पुढे वसंतदादा आणि गुलाबराव या जोडीने जणू सांगली जिल्ह्याच्या सहकाराचा पायाच घातला. पुढे देशस्तरावर काँग्रेसमध्ये फूट पडून इंदिराजींनी आय काँग्रेस स्थापनेचा निर्णय घेतल्यानंतर दादांनी यशवंतरावांना, तर गुलाबरावांनी इंदिराजींच्या काँग्रेसमध्ये जायचा निर्णय घेतला, मात्र त्यानंतर जिल्हा बँक मात्र गुलाबरावांच्या हातीच कायम ठेवण्याचा मोठेपणा दादांनी दाखवला होता. जिल्हा बँकेत राजकारण आणू नका, असा स्पष्ट संदेश दादांनी त्या काळात काँग्रेसजनांना दिला.

१९५५ च्या पहिल्या संचालक मंडळात उपाध्यक्ष म्हणून सहभागी झालेले गुलाबराव पुढे सुमारे तीन दशके बँकेच्या कारभारात राहिले. याच कालखंडात जिल्ह्यातील साखर कारखानदारी विस्तारली. सिंचन योजना सुरू झाल्या. जवळपास चौदा वर्षे त्यांनी अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी खेडोपाड्यापर्यंत बँकेचा पतपुरवठा विस्तारण्यासाठी सायकल खरेदी, शेळ्या-मेंढ्या खरेदीपासून द्राक्षबागांसाठी पतपुरवठा करण्यापर्यंतची धोरणे त्यांनी राबवली.

हेही वाचा: पालिका कर्मचाऱ्यांना आता परस्पर रजेवर जाता येणार नाही कारण....

या साऱ्या कालखंडात बाजीराव बाळाजी पाटील, जोतिरामदादा पाटील सावर्डेकर, यशवंत भीमराव घोरपडे, एस. डी. पाटील, रुस्तमराव देशमुख, महादेव गोडबोले, केशवराव चौगुले, आबासाहेब शिंदे-म्हैसाळकर, मोहनराव पाटील, बाळासाहेब वग्याणी, बाळासाहेब गुरव, दादासाहेब पाटील असे अनेक दिग्गज नेते होते. ही सारीच मंडळी राजकारण-समाजकारणात स्वतंत्रपणे कार्यरत होती. काँग्रेसमधील विविध मतप्रवाहांचे प्रतिनिधित्व करीत. मात्र बँकेत आपापल्या विचारांचे जोडे बाहेर काढूनच येत होते. त्या काळात बहुतेक जिल्हा कोरडवाहू होता. खेडोपाड्यात विकासच्या संधी पोहोचल्या नव्हत्या. मात्र शेतकऱ्यांच्या छपरात प्रगतीचा दिवा लावण्याच्या इराद्याने त्या काळात जे काही प्रयत्न झाले. त्या प्रयत्नांची मशाल जिल्हा बँकेने तोलली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

loading image
go to top