सांगलीत मनोरुग्णांनी धरलीये पर्यावरणपूरक गोष्टींची कास ; जपताहेत धूप, इकोफ्रेंडली पणत्यांची कला

अजित कुलकर्णी
Sunday, 13 December 2020

मात्र इथे उपचाराबरोबरच त्यांचे मन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रमवले जाते. त्याचे दृश्‍य परिणामही दिसत आहेत.

सांगली : इथे कोण व्यसनाच्या आहारी गेलाय, अनेकजण स्वमग्न, मतिमंद, गतीमंद आहेत, तर कोण स्मृतीभ्रंश झाल्याप्रमाणे वागतोय. प्रत्येकाच्या नाना तऱ्हा. त्यांच्यावर नियमित तसेच दीर्घकालीन उपचार सुरु आहेत. मात्र इथे उपचाराबरोबरच त्यांचे मन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रमवले जाते. त्याचे दृश्‍य परिणामही दिसत आहेत.

आक्रस्ताळेपणा करणारे, रागावर नियंत्रण ठेवू न शकणारे, असंबध्द बडबडणारे, बेभान रुग्णांचे हात आता हळूवारपणे कलात्मकता जपताहेत. पर्यावरणपूरक गोष्टींची त्यांनी कास धरलीय. शेणापासून इकोफ्रेंडली पणत्या, सुगंधी धूप निर्मितीसाठी त्यांचे हात आता सरावलेत. मिरजेच्या मानसवर्धन पुनर्वसन केंद्रातील हे परिवर्तन निश्‍चित बोलके आहे. येथील संवेदना फौंडेशनतर्फे मानसिक रुग्णांवर उपचारासाठी सुरु केलेल्या या केंद्रात दूरदूरचे रुग्ण दाखल आहेत. केंद्रातील डॉक्‍टर्स, परिचारिका, समुपदेशक आपलेपणाने त्यांच्यासाठी सेवारत आहेतच; शिवाय त्यांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने अनेक कार्यक्रम सुरु आहेत.

हेही वाचा - लहान मुले पळवणाऱ्या फासे पारध्यांच्या टोळीची अफवाच ; पोलिसांकडून खुलासा -

देशी गायीच्या शेणापासून पणत्या तयार करण्याची कल्पना केंद्राचे रौनक शहा यांच्या डोक्‍यात आली. याकामी नागपूर येथील स्वानंद गोविज्ञान प्रशिक्षण केंद्राची मदत झाली. पणत्या तसेच धूप बनवण्याचे साचे, प्री-मिक्‍स तसेच विविध आयुर्वेदिक मसाले या केंद्राकडून मिळाल्यानंतर ते बनवण्याचे प्रशिक्षणही झाले. शेणाची पावडर, प्री-मिक्‍स तसेच साधी माती यापासून बनवलेल्या पणत्या पर्यावरणपूरक असल्याने दिवाळीच्या काळात त्यांना मोठी मागणी होती. शेण तसेच मसाल्यापासून तयार केलेले धूपही सुवासिक व सात्विक आहे. 

"केंद्रात दाखल रुग्णांची मनस्थिती सुधारण्यासाठी त्यांना सतत कार्यप्रवण ठेवणे गरजेचे असते. एकलकोंड्या व्यक्‍ती येथे एकत्र बसून संघभावनेने काम करतात. त्यामुळे एकाग्रता वाढण्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते. त्याशिवाय ऐक्‍य, आपुलकी वाढीस लागते. पणत्या, धूप नाममात्र किंमतीत त्या उपलब्ध असून त्या खरेदी करून मनोरुग्णांच्या आयुष्यात उजेड निर्माण करण्यास समाजाने हातभार लावावा."

- रौनक शहा, अध्यक्ष संवेदना फौंडेशन, सांगली
 

हेही वाचा -  शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू: आर्किड, गार्नेशिया, गुलाब फुलांना मिळाला चांगलाच दर - ​

 

 

संपादन - स्नेहल कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in sangli inculcating institution this people create new things in sangli