मी राजीनामा देणार नाही! ; सांगलीत कडेगावला नगराध्यक्षपदावरुन राजकारण तापले

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 February 2021

मी नगराध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाही. असा निर्धार नगराध्यक्षा नीता देसाई यांनी व्यक्त केला. 

कडेगाव (सांगली) : आमदार मोहनराव कदम व राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कडेगाव शहराचा सर्वांगीण विकास सुरु आहे. असे असताना माझ्या राजीनाम्यावरुन राजकीय वातावरण तापू लागले आहे. तर नगराध्यक्षपद हे हक्काच्या आरक्षणाने अडीच वर्षासाठी माझ्या वाट्याला आलेले आहे. त्यामुळे मी नगराध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाही. असा निर्धार नगराध्यक्षा नीता देसाई यांनी व्यक्त केला. 

त्या म्हणाल्या, नगराध्यपदाच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आरक्षणामुळे मला अडीच वर्षासाठी हे नगराध्यक्षपद मिळालेले आहे. या कालावधीत राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शहरांत मोठ्या प्रमाणात विकासकामे राबविणार आहे. तर सध्या कोरोनाच्या महामारीने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यावर मात करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्यामुळे इतर विषयाकडे लक्ष देण्यासाठी माझ्याकडे वेळच नाही. आणि राहता राहिला विषय माझ्या राजीनाम्याबाबत तर 'मी माझ्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाही.'

हेही वाचा - भाजपमध्ये मोठी फूट ; सांगलीच्या महापौरपदी दिग्विजय सूर्यवंशी
 
नगराध्यक्षपदाच्या सेकंड टर्मसाठी सर्वसाधारण महिला असे आरक्षण आहे. तर या प्रवर्गातील मी एकमेव नगरसेविका असल्याने मला नगराध्यक्षपद हे आरक्षणामुळे मिळाले आहे. त्यामुळे इतर प्रवर्गातील नगरसेविकांना नगराध्यक्षपद देण्याचा प्रश्नच येत नाही. तर इतर कोणतेही आरक्षण असेल तर आम्हाला संधी मिळत नाही. 

उपनगराध्यक्ष राजू जाधव म्हणाले, सहा महिन्यासाठी नवीन नगराध्यक्ष झाले तर ते कुठलेही काम करु शकणार नाहीत. कारण त्यांना हे पद समजून घेण्यातच त्यांचा कार्यकाल संपेल. ते फक्त खुर्चीवर येवून बसण्याचे काम करतील. तेव्हा सहा महिन्यांसाठी नगराध्यक्षा बदलण्यापेक्षा विद्यमान नगराध्यक्षा नीता देसाई यांचा अडीच वर्षांचा कार्यकाल पुर्ण व्हावा, तर सध्या नगराध्यक्ष बदलण्याबाबत ज्या काही चर्चा सुरु आहेत. तो विषय थांबविण्यासाठी मी प्रयत्न करतोय. 

कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही 

नगराध्यक्ष बदलाबाबत माझ्यावर कोणाचाही दबाव नाही,तसेच कोणाच्याही दबावाला मी बळी पडणार नाही असा खणखणीत इशारा नगराध्यक्षा नीता देसाई यांनी यावेळी दिला.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sangli kadegaon political leaders do not reasine in mayor in sangli