सांगली-कोल्हापुरात ‘चोर-पोलिस’ खेळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

गृहविभागावर नामुष्की - पोलिसांनाच सापडत नाहीत पोलिस  
सांगली - सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात सध्या चोर-पोलिसांचा खेळ सुरू आहे. संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल झाल्यावर त्यांनी स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर न राहता पसार होणे दुर्दैवी आहे. पोलिसांना आपल्याच डिपार्टमेंटमधील आरोपी असलेले पोलिस सापडत नाहीत, याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे. सांगलीच्या तत्कालीन एलसीबीच्या पथकाने ९ कोटी १८ लाखांच्या रकमेवर डल्ला मारला. त्यांना पकडण्यासाठी कोल्हापूर एलसीबी पथकाने प्रयत्न केले. त्यानंतर ‘सीआयडी’चे पथक आता मागावर आहे.

छाप्यावेळी पोलिसांकडून मुद्देमालावर डल्ला मारण्याच्या तक्रारींकडे बऱ्याचदा केवळ संशयाने पाहिले जायचे. परंतु सांगली एलसीबीच्या पोलिसांवर पाच महिने चौकशीनंतर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर एखाद्या सराईत गुन्हेगारांप्रमाणे पोलिसांचे परागंदा होणे एकूणच पोलिस दलाबद्दलचा उरला सुरला विश्‍वासही संपवणारे ठरले.

अनेक गुन्ह्यांतील फरारी गुन्हेगारांना पकडण्याची पोलिसांवर विशेष जबाबदारी ‘एलसीबी’वर असते. इथे सांगलीच्या ‘एलसीबी’ पथकातील सात जणांना पकडण्यासाठी कोल्हापूचे ‘एलसीबी’ पथक सुरवातीला मागावर होते. असा प्रकार कोल्हापूर परिक्षेत्रातील पहिलाच. सांगली एलसीबीने गतवर्षी १२ मार्चला मिरजेतील मोहिद्दीन अबुबकर मुल्ला याच्या घरावर छापा टाकून तीन कोटींहून अधिक रोकड जप्त केली. चोरट्या मोहिद्दीनने जेथे डल्ला मारला, ते ठिकाण दाखवल्यानंतर एलसीबीचे निरीक्षक विश्‍वनाथ घनवट आणि सहायक निरीक्षक सूरज चंदनशिवे यांनी दोन वेळा तेथे जाऊन नऊ कोटी १८ लाख रुपये हडप केली, अशी मूळ फिर्याद आहे. एक जबाबदार अधिकारी म्हणून घनवट, चंदनशिवे यांच्यासह पोलिस कर्मचारी शरद कुरळपकर, दीपक पाटील, शंकर पाटील, रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे यांनी थेट पोलिस चौकशीला सामोरे जायला हवे होते. मात्र त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याची नोटीस घरावर चिकटवण्याची वेळ त्यांच्याच सहकाऱ्यांवर आली. हे सारे यथावकाश ‘फरार’ म्हणून घोषित होतील, न होतील. मात्र लोकांच्या लेखी ते फरारीच आहेत. आता हा तपास राज्य गुन्हे अन्वेषणकडे देण्यात आला आहे.

हे प्रकरण फिर्यादींच्या पवित्र्यामुळे चव्हाट्यावर आले तरी या प्रकरणाच्या तपासातील आक्षेपार्ह बाबी पोलिस दलातीलच वरिष्ठांनी योग्य वेळी नमूद केल्या होत्या. हा सध्याच्या अंधकारमय संशयातील एक आशेची पणतीच म्हणावी. आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने या संपूर्ण प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन लोकांचा व्यवस्थेवरील विश्‍वास कायम रहावा, असा तपास करावा, अशी अपेक्षा आहे.

यंत्रणाच सडलेली !
तीन वर्षांपूर्वी जिल्हा पोलिस दलातील तीन कर्मचारी टीप मिळाल्यानंतर तमिळनाडू येथे एका सराफाकडे गेले  होते. तेथे पोलिस असल्याचे सांगून तीन किलो सोने आणि रोकड लांबवण्याचा प्रयत्न केला. सराफाच्या दक्षतेमुळे हा प्रकार फसला. जिल्हा पोलिस दलाकडे तक्रार आल्यानंतर तीन पोलिसांना खात्यातून बडतर्फ केले होते. येथे तर सात पोलिसांवर घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. आताही तशाच कारवाईची अपेक्षा आहे. पोलिस दलातील गुन्हेगारी वर्तनावर कठोर कारवाई होणे यंत्रणेच्या शुद्धीकरणासाठी अनिवार्य आहे. अन्यथा कर्करोगाप्रमाणे यंत्रणाच सडून जायचा धोका आहे.

Web Title: sangli-kolhapur thief-police game