"डल्ला' मारणाऱ्या पोलिसांचा महिन्यापासून चकवा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

सांगली - चोरीचा तपास करायला गेलेल्या सांगली "एलसीबी' च्या पथकाने नऊ कोटी 18 लाख रुपयांवर "डल्ला' मारल्यामुळे खाकी वर्दीला डाग लागला. गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासात सहकार्य करण्याऐवजी गुन्हेगाराप्रमाणे परागंदा होऊन वर्दीला लागलेला डाग आणखी गडद केला. तब्बल महिनाभर सात पोलिस चकवा देत फिरत आहेत. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली गेली; परंतु त्यापुढे जाऊन संबंधितांना खात्यातून "बडतर्फ' करण्याचे संकेत मिळत आहेत. 

वारणानगर येथील शिक्षक कॉलनीतील एका घरात चोरी करून मोहिद्दीन मुल्ला याने कोट्यवधी रुपये आणले. चोरीची रोकड मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये ठेवली. नवी कोरी बुलेट घेऊन फिरत असताना तो "एलसीबी' च्या नजरेत आला. 12 मार्च 2016 रोजी "एलसीबी' ने त्याच्या घरावर छापा टाकून तीन कोटी सात लाख रुपये जप्त केले. मुल्लाचा तपास करताना "एलसीबी' चे पथक दोनवेळा वारणानगर येथे गेले. तेथे त्यांनी दोन टप्प्यात नऊ कोटी 18 लाख रुपयांवर डल्ला मारल्याची फिर्याद बांधकाम व्यावसायिक झुंझार सरनोबत यांनी दिली. 

महिन्यापूर्वी गुन्हा दाखल झाल्यापासून "एलसीबी' चे तत्कालीन निरीक्षक विश्‍वनाथ घनवट, सहायक निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, हवालदार दीपक पाटील, शंकर पाटील, पोलिस नाईक कुलदीप कांबळे, रवींद्र पाटील हे पसार झाले. सातजणांना निलंबित केले. सुरवातीला कोल्हापूर "एलसीबी' ला त्यानंतर "सीआयडी' पथकाला चकवा देत सातजण अटक टाळण्यासाठी पळत आहेत. सहाजणांचा अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळला गेला आहे. 

सात पोलिसांवर तपासाच्या नावाखाली घरफोडी केल्याचा गुन्हा दाखल आहे. पोलिस पथकाने एवढ्या मोठ्या रकमेवर डल्ला मारण्याची राज्य पोलिस दलातील ही पहिलीच घटना म्हणावी लागेल. त्यामुळे खाकी वर्दीवर डाग लागला गेला. सांगली पोलिसांची राज्यभर बदनामी झाली. चार ते पाच महिने "आयपीएस' अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर गुन्हा नोंदवला गेला. चौकशीत तथ्य असल्यामुळेच गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कारवाई होणार गृहीत धरूनच सातजण पसार झाले आहेत. पोलिसच पोलिसांना चकवा देत फिरत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर सातजणांना निलंबित केले. महिना झाला तरी अटक टाळण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सातजणांना फरारी घोषित करण्याची प्रक्रिया "सीआयडी' ला सुरू करावी लागणार आहे. तसेच सातजणांना पोलिस दलातून बडतर्फ करण्याचे संकेतही मिळत आहेत.

Web Title: Sangli - LCB Squad