
Sangli : राज्यात सध्या स्थगिती सरकार : पवार
तासगाव : राज्यातील सरकार हे सरकार स्थगिती सरकार आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दुसरीकडे चिन्ह व नावाबद्दल निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू आहे. अरे कोणत्या जमान्यात नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली. मणेराजुरी (ता. तासगाव) येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तासगाव व कवठेमंकाळ तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच, सदस्यांचा सत्कार व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
आमदार सुमनताई पाटील, ‘राष्ट्रवादी’चे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, युवक नेते रोहित पाटील, महांकाली उद्योगसमूहाच्या श्रीमती अनिता सगरे, तालुकाध्यक्ष विश्वास पाटील, हणमंतराव देसाई उपस्थित होते. ‘आठवणीतील आबा’ स्मरणिकेचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. ५३ ग्रामपंचायतींतील ‘राष्ट्रवादी’च्या सदस्यांचा सत्कार झाला. तब्बल एक तास विविध विषयांवर पवार यांनी चौफेर फटकेबाजी केली.
पवार यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ‘‘आता तुमची जबाबदारी वाढली आहे. गाव स्वच्छ ठेवा. विकासाची भूमिका ठेवा. गावाचा विकास झाला, तर तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याच्या अनुषंगाने देशाचा विकास होईल. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला ग्रामपंचायतीत चांगले यश मिळाले आहे.’’
राज्य सरकारवर टीका करताना पवार यांनी, ४० आमदार म्हणजे राज्य नव्हे. विरोधी आमदारांच्या विकासकामांना कात्री लावली जात आहे. महापुरुषांचा अवमान होत आहे. लोकांना चीड आणणाऱ्या गोष्टी वारंवार केल्या जात आहेत. उद्योगधंदे राज्याबाहेर जात आहेत. लाखो रोजगार बुडत आहे. अच्छे दिन म्हणजे हेच का, असे विचारण्याची वेळ आली. आर. आर. आबांच्या स्मृतींना उजाळा देताना आबांनंतर रोहित यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असेही ते म्हणाले.
रोहित पाटील यांनी पाच वर्षांत आमदार सुमनताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कामाची पोचपावती ग्रामपंचायतीनिमित्त मिळाली. विकासात्मक राजकारणाची भूमिका असताना मणेराजुरी एमआयडीसीबाबत अडवणुकीची भूमिका घेतली जात आहे. द्राक्ष शेतकऱ्यांचे नुकसान न होता एमआयडीसी होईल. प्रसंगी मंत्रालयाच्या पायरीवर आंदोलनाची तयारी असल्याचेही सांगितले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सतीश पवार यांनी प्रास्ताविक केले. हणमंत देसाई यांनी आभार मानले.
माफी मागणार नाही
अनिल देशमुख यांच्याऐवजी पवार यांनी अनिल बाबर असा उल्लेख झाल्याचे लक्षात येताच त्यांनी चूक झाल्यावर मी मान्य करतो. थेट बोलणारा माणूस आहे. काही जण माफी मागा म्हणतात, मी मागणार नाही. स्वराज्यरक्षक ते स्वराज्यरक्षकच ! मी शब्दावर ठाम आहे. स्वराज्यरक्षक शब्दातच सगळे आले, अशी फिरकीही घेतली.
अजिदादांची फटकेबाजी
पवार म्हणाले, ‘‘पंतप्रधान मुंबईत येऊन गेले. मुंबईत अमुक करू, तमुक करू, अशी आश्वासने दिली. मुंबईत ते सगळे व्हायलाच हवेत; पण राज्याला काय देणार, याबद्दल ते काहीच बोलले नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी यावर बोलायला पाहिजे होते. कोणी ताम्रपट घेऊन आलेला नाही. आधी आम्ही होतो आता ते आहेत. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती पाहा, ‘अच्छे दिन’ आले का हे पाहा, मतदार हा राजा आहे, तो ठरवतो तो सत्तेत येतो.’’