स्वकियांसोबतच्या डावपेचात अडकली आघाडी

स्वकियांसोबतच्या डावपेचात अडकली आघाडी

स्वातंत्र्यानंतर प्रथमच सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पराभूत झाली. त्या पराभवाचे विश्‍लेषण मोदी लाटेचा परिणाम असे केले गेले. देशातच ४२ जागांवर येऊन ठेपल्याने काँग्रेसच्या इथल्या पराभवाची फारशी चर्चा त्यावेळी झाली नाही. मात्र, त्यातून धडा घेऊन काँग्रेसजन एकमुखाने पुन्हा जनतेसमोर जायच्या मनस्थितीत पाच वर्षे लोटली तरी नाहीत, हेच सध्याच्या उमेदवार ठरवण्याच्या घोळातून स्पष्ट होत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार कोण, यावर आज काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये राज्य आणि जिल्ह्यातही उलट सुलट राजकीय विधाने सुरू राहिली. सांगलीची जागा काँग्रेसला की राष्ट्रवादीला, यावरून राज्यात आघाडीमध्ये सुरू असलेल्या चर्चेकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.  

नगर लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला सोडली जावी, यासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय आक्रमक झालेत. ही जागा सध्या राष्ट्रवादीकडे आहे. ती जागा काँग्रेसला सोडली तर त्या बदल्यात सांगलीची जागा राष्ट्रवादी घेणार असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. त्याचवेळी जयंत पाटील यांनी ‘नगर’च्या निर्णयाच्या बातम्यात तथ्य नसल्याचे ट्विट करून संभ्रम वाढवला आहे. हा घोळ काँग्रेस प्रथेप्रमाणे अखेरच्या दिवसापर्यंत सुरू राहील, अशी स्पष्ट चिन्हे आहेत. 

सांगली लोकसभेबाबत इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांनी ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांना विधान परिषद निवडणुकीवेळी केलेला विरोध चूक होती, असे सांगत भर बैठकीत हात जोडले. त्याचवेळी त्यांनी विश्‍वजित कदम यांनी उमेदवारी घ्यावी, अशी जाहीर गळही घातली. कदम कुटुंबाकडून लोकसभा निवडणुकीत प्रामाणिक मदत होणारच नसेल तर त्यांनीच उमेदवारी घ्यावी आणि लढावी. आम्ही मात्र पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी राहू, असा संदेश वसंतदादा कुटुंबातून पक्षश्रेष्ठींना कळवण्यात आला आहे.

त्यामागची व्यूहरचना हीच आहे की, विश्‍वजित कदम उमेदवारी घेणार नाहीत आणि आम्ही लढायला तयार आहोत; मात्र उमेदवारी दिली जात नाही, हा संदेश देण्याचा छुपा हेतू आहे. विशाल आणि प्रतीक यांच्या वक्तव्याची तीच अदृष्य लाईन आहे. कधीकाळी सांगली लोकसभेची काँग्रेसची उमेदवारी बंधू मोहनराव कदम यांना मिळवून देण्यासाठी पतंगराव कदम यांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत जोरदार ताकद लावली होती. आता त्याच दोन कुटुंबात एकमेकाचे नाव सुचवण्याची राजकीय कसरत सुरू आहे.

अर्थात त्यामागे डावपेच जरूर आहेत. मात्र, त्यामागची राजकीय हतबलताही स्पष्ट होत आहे. ते करताना जे लढायला इच्छुक आहेत त्या शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नावाबाबत दोन्ही गट जाहीर भूमिका मात्र घेत नाहीत. प्रतीक पाटील यांचे नाव पडद्याआड रेटायचे आणि शेवटच्या क्षणी त्यांना विरोध होत असेल तर स्वतःलाच उमेदवारी घ्यायची, यासाठीच विशाल पाटील यांनी काल काँग्रेस कमिटीत माफीनामा सादर केला आहे.

कदम यांच्याशी जुळवून घेण्याचा विशाल यांचा प्रयत्न हा उमेदवारीसाठीच्या प्रयत्नांचा भाग असेल तर असाच प्रयत्न आता त्यांना जयंत पाटील यांच्यासाठी करावा लागेल. कारण नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीवेळी त्यांनी राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीला विरोध करताना जयंतरावांना लक्ष्य केले होते. जयंतरावांची स्मरणशक्ती मोठी आहे. त्यांना अनेक पिढ्यांपासूनचे बरेच काही लक्षात असते. आधी काँग्रेसमध्ये एकीनंतर राष्ट्रवादीसोबत हाच प्रवास अजूनही सुरू आहे. दोन्ही पक्षांना देश आणि जिल्हास्तरावर भाजपच्या आव्हानाचे पुरेसे भान नसल्याचेच हे द्योतक आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com